अन्न टाकून माजणार्‍यांना संदेश देणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात

0

नवी दिल्ली : समारंभामध्ये होणार्‍या अन्नाच्या नासाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त करत अशा कार्यक्रमांमध्ये अन्नाची नासाडी थांबवावी, जेवढी भूक तेवढेच अन्न ताटात घ्या, वाया घालवू नका, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आवाहन केले आहे. मन की बात या विशेष भाषणाच्या कार्यक्रमातून त्यांनी हे आवाहन केले आहे.

तसेच देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अस्वच्छतेविरोधात रोष निर्माण होणे गरजेचे आहे. स्वच्छता आंदोलन हे सवयीशी जोडलेले आहे. हे काम कठीण आहे, पण करावेच लागेल, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. देशातील सव्वाशे कोटी भारतीयांना बदल हवा असून बदल घडवण्याचे प्रयत्नही सुरु आहेत. याच बदलातून नवीन भारताची पायाभरणी होईल, असा विश्वास करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल व्यवहार करुन तुम्ही भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधातील युद्धाचे सैनिक होऊ शकता, असे आवाहनही केले.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामधून देशवासीयांशी संवाद साधला. मन की बातचा हा 30वा भाग होता. नोटाबंदीनंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली असून तब्बल दीड कोटी लोकांनी आतापर्यंत भीम अ‍ॅप डाऊनलोड केले आहे, असा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. शिवाय, भीम अ‍ॅपमुळे भारताची कॅशलेसकडे वाटचाल सुरु झाली असल्याचेही ते म्हणाले.

भीम अ‍ॅपच्या माध्यमातून 50 रु ते 6 हजार रुपयांपर्यंतच्या प्रत्येक व्यवहाराचा लकी ड्रॉमध्ये समावेश करण्यात येणार आहे. यातील पहिल्या विजेत्याला 1 कोटी रुपये मिळणार आहेत. याशिवाय इतर अनेक रकमांची बक्षिसंही ठेवण्यात आलेली आहेत. ही सोडत 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी पार पडणार आहे.