अन्न नको, बंकर द्या!

0

नौशेरा : आम्हाला अन्न नको पण, स्वत:चे बंकर द्या, अशी मागणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ राहाणार्‍या 5000 काश्मिरींनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मंगळवारी केली. पाकिस्तानकडून होणार्‍या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे येथील नागरिकांना शाळेत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कॅम्पमध्ये राहावे लागत आहे. चार महिन्यांपासून त्यांनी घर सोडले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह काश्मीर दौर्‍यावर आहेत. यावेळी या नागरिकांनी ही मागणी केली.

सरकारने बंकर द्यावे…
काश्मिरी नागरिकांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सांगितले की, पाकिस्तानकडून होणार्‍या गोळीबारापासून बचाव होण्यासाठी आमच्या घरांमध्ये सरकारने बंकर तयार करुन द्यावेत. नौशेरामध्ये या नागिरकांचे सध्या सहा कॅम्प आहेत. जनगड येथील रहिवासी व निर्वासितांच्या समितीचे अध्यक्ष प्रश्तोम कुमार म्हणाले, आमची पहिली मागणी आहे की, नियंत्रण रेषेजवळ जर आम्हाला परत राहण्यास सांगाल तर सीमेजवळील नागरिकांच्या घरांमध्ये त्यांना बंकर बनवून द्यावे. गेल्या काही महिन्यात पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारात 4 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 6 जखमी झाले आहे. मंगळवारीही पाकिस्तानने नौशेरा येथे गोळीबार केल्याने गृहमंत्र्यांना नागरिकांचे म्हणणे ऐकूण घ्यावे लागले.