अन्न पुरवठा विभाग प्रमुखांना छावा मराठा युवा महासंघाकडून बांगड्यांचा आहेर

0

घरगुती गॅसचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाईची मागणी

पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू असलेला दिसून येतो आहे. हा काळाबाजार करणार्‍यांवर परिमंडळ अधिकारी अन्न व पुरवठा विभाग अ आणि ज यांच्यामार्फत कोणतीही ठोस कारवाई होत नाही. वारंवार पोलिसांना निवेदन देऊनही पोलिस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे या लोकांचे एकमेकांशी संबंध आहेत, हेच सिद्ध होते. ही कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ राजेंद्र देवकर-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी अन्न पुरवठा विभाग प्रमुखांना बांगड्यांचा आहेर देण्यात आला.

पोलिसांचे काळ्याबाजाराला अभय
यावेळी बोलताना राजेन्द्र देवकर-पाटील म्हणाले की, गॅस सर्व्हिसिंगच्या नावाखाली घरगुती गॅस छोट्या तीन व चार किलोच्या टाकीतून रिफीलींग करून चढ्या दराने विकण्याचा गोरखधंदा सध्या खूप जोमात सुरू आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात काबाडकष्ट करून राहणारा कामगार, शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी, बांधकाम क्षेत्रातील कामगार यांना याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महत्वाची बाब म्हणजे रिफीलींग करणे हे बेकायदेशीर तर आहेच पण खूप धोकादायकही आहे. चिखली येथील व्यावसायिक गॅस रिफीलींग करताना स्फोट होऊन रस्त्यावर उभे असलेले हिंगे नामक व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. तरी अन्न व पुरवठा प्रशासन आर्थिक हितसंबंधामुळे अशा काळ्या धंद्याला अभय देत असून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असे प्रकार चालू आहेत.

जीवितहानी झाल्यास अधिकारी जबाबदार
त्यामुळे निवेदन देऊनही अन्न पुरवठा विभागाचे आधिकारी कारवाई करत नसतील तर त्यांना खुर्चीत बसण्याचा मुळीच अधिकार नाही. त्यांनी बांगड्या भरून घरी बसावे असा इशारा देत तहसीलदार तावरे व इतर अधिकार्‍यांना बांगड्या व चोळी देऊन छावा मराठा युवा महासंघाने निषेध व्यक्त केला. तसेच संबंधितांवर संघटनेतर्फे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार. गॅसचा काळा बाजार न थांबल्यास 420चा गुन्हा दाखल करणार असल्याचेही देवकर पाटील म्हणाले. या आंदोलनात छावाचे संस्थापक अध्यक्ष धनाजीराव येळकर-पाटील, भालचंद्र नाना फुगे, सुरज ठाकर, गौरव धनवें, रोहिदास तांबे, गणेश सरकटे-पाटील, मनोज पाटील, देवेंद्र भदाने, राजू पवार, अतुल वर्पे, विजय, लोट, श्रीकांत पवार, अर्चना मेंगडे, राजश्री शिरवळकर, सुनीता फुले, नयना नारखेडे, पूजा भांडारे, प्रियांका त्रिभुवन आदीसह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.