अन्न सुरक्षा योजनेच्या याद्यांची चौकशी करा

0

भडगाव। येथील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय योजनेच्या प्रसिध्द झालेल्या यादीत तहसिलदार यांनी मर्जीतील लाभार्थीची नावे घेवुन इतर गरजु लाभार्थीवर झालेल्या अन्यायाची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे नगरसेवकासह नागरिकांनी केली आहे. नगरपरिषदेला तहसिलदार यांनी पत्र देवुन प्रत्येक गरजुची नावे व कागदपत्रे सादर करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर प्रत्येक नगरसेवकांस गरजु लाभार्थीची नावे व कागदपत्रे जमा करण्याचे तोंडी आदेश करण्यात आले होते. त्याप्रमाणे गरजु लाभार्थीची नावे तहसिल कार्यालयात ऑक्टोबर 2016 मध्ये सादर केल्यानंतर 22 व 31 मे 2017 रोजी भडगाव गावाच्या याद्या प्रसिद्ध केल्या परंतु यादीचे अवलोकन केले असता ज्याप्रमाणे नगरसेवकांना तोंडी आदेश केले होते. त्याप्रमाणे लाभार्थीची नावे न घेता केवळ दोन ते तिन नगरसेवकांच्या मर्जीतील लाभार्थीची नावे घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

जानेवारी मध्ये 927 इष्टांक आला होता. मधल्या काळात आचार संहिता असल्याने आदेश काढता आला नाही. शहरी भागातील इष्टाकं कमी झाल्यामुळे मंजुरी देता आले नाही. इष्टाकं नुसारच याद्यांना मंजुरी दिली आहे. इष्टाकं वाढवुन आल्यास मंजुरी देता येईल.
सी.एम.वाघ, तहसिलदार, भडगाव

खरे गरजु लाभार्थीला लाभ न देता तहसीलदार हे राजकीय दबावाखाली दोन ते तीन नगरसेवकांचेच काम केले व जीआरच्या नावाखाली इतरांना उडवाउडवीचे उत्तर देतात.
संतोष महाजन, सामाजिक कार्यकर्ते

चौकशी न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा
यासंदर्भात तहसिलदार यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी आम्हास सांगितले ज्या लाभार्थीला लाभ हवा असेल त्यांनी आम्हाला येवुन भेटावे त्याशिवाय आम्ही मंजुर करणार नाही. आमसभेत देखिल प्रश्न उपस्थितीत करुन योजने बाबत माहिती विचारली असता तहसिलदार यांनी सांगितले 3 मार्च 2017 चा जीआर लागु असल्याने याद्या मंजुर करता येत नाही. जीआर उठल्यावर याद्या मंजुर करु असे सांगितले. तर 22 व 31 मे 2017 रोजी मंजुर झालेल्या याद्या कोणत्या नियमाने मंजुर केल्या असल्याचे लेखी खुलासा व्हावा असे निवेदनात म्हटले आहे.

सदर यादी तहसिलदार यांनी राजकीय दबावा खाली तयार केली असल्यामुळे तिची चौकशी व्हावी व आमच्या मार्फत जमा केलेल्या गरजुंच्या प्रकरणाची चौकशी न झाल्यास तहसिल कार्यालय समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर नगरसेवक नंदकिशोर पाटील, प्रशांत पवार, सुभाष पाटील, नगरसेविका योजनाताई पाटील, प्रविण पाटील, जगन भोई, संतोष महाजन, भैय्यासाहेब पाटील यांनी निवेदन दिले आहे.