महाराष्ट्र मजदूर संघटनेचा इशारा
पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील के. एस. बी. चौकातील ग्रेडसेपरेटरचे (समतल विलगक) ‘कै. अण्णासाहेब पाटील’ नामकरण करण्याची मागणी करुन तीन महिने उलटले आहेत. महापालिका प्रभाग समितीमध्ये याबाबतचा ठराव होवूनही महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. महापालिकेने ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटनाची घाई केली. मात्र, नामकरण अद्याप केले नाही. माथाडी कामगारांच्या मागणीकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी केला आहे. येत्या 5 दिवसात ग्रेडसेपरेटरचे नामकरण करावे अन्यथा परस्पर नामकरण सोहळा उरकू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महापौर, आयुक्तांना निवेदन
यासंदर्भात संघटनेच्या वतीने महापौर नितीन काळजे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरात विविध क्षेत्रात काम करणार्या कामगारांसोबत माथाडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे लक्षात घेवूनच महापालिकेच्या वतीने चिंचवडच्या केएसबी चौक येथे माथाडी कामगारांचे आराध्य दैवत दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. त्यामुळे केएसबी चौकाची ओळख अण्णासाहेब पाटील पुतळा चौक अशी निर्माण झाली आहे. महापालिकेने शहराच्या विकासात व सौंदर्यात भर घालणारा असा उड्डाणपूल येथे बनवला आहे. या उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा पार पडला असून पूल वाहतुकीसाठी खुला देखील झाला आहे.
ठराव मंजूर, तरीही प्रशासन ठिम्म
क प्रभाग समितीनेही नामकरणाचा ठराव मंजूर केला आहे. मात्र, तीन महिने उलटूनही महापालिका प्रशासन ग्रेडसेपरेटरच्या नामकरणाबाबत कोणत्याही हलचाली करताना दिसत नाही. प्रशासनाने सहनशीलतेचा अंत पाहू नये. ग्रेडसेपरेटरचे येत्या 5 दिवसात नामकरण करावे अन्यथा महाराष्ट्र मजदूर संघटना शहरातील माथाडी कामगारांच्या साक्षीने परस्पर या ग्रेडसेपरेटरचे नामकरण सोहळा उरकून घेईल, असाही इशारा सय्यद यांनी दिला.
प्रभाग समितीच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता
दरम्यान, महापालिकेच्या क प्रभाग समितीच्या 4 ऑक्टोबर 2017 रोजी झालेल्या मासिक सभेमध्ये ठराव क्रमांक 10, विषय क्रमांक 4 नुसार नगरसदस्य राहुल भोसले व समीर मासुळकर यांनी ग्रेडसेपरेटरला नाव देण्याबाबतचा ठराव मांडला होता. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन होवूनही त्याचे नामकरण अद्याप झाले नाही. प्रभाग समितीने मंजूर केलेल्या ठरावाला महापालिका प्रशासनाच्या लेखी काही महत्त्व आहे की नाही? माथाडी कामगारांच्या भावनांना सन्मान महापालिका करणार की नाही? असा सवाल संघटनेने केला आहे.