पुणे-मराठा आरक्षणाबाबत निर्णय होईल, समाज बांधवांनी संयम ठेवावे, तोडफोड-जाळपोळ करू नये असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज पुण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील १०० हून अधिक समन्वयकाच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.
सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत अनेक बळी गेले आहेत. मुलभूत अधिकारांसाठी भिकाऱ्यासारखे फिरण्याची वेळ आली आहे. वेळीच आरक्षण दिले असते तर आयोगाची गरज भासली नसती. आरक्षणासाठी जीव देणारे, जीव घेतील, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत. आम्ही न्याय हातात घेतला तर सरकारच जबाबदार असाल. जी काही परिस्थिती निर्माण होईल, त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आरक्षणावरून सरकार किती मौन बाळगणार असा सवाल करत सरकारने संगीतखुर्ची थांबवली पाहिजे, असे म्हटले.