अन्यथा कठोर कारवाई करणार

0

भुसावळ। येथील सध्या गणपती, नवरात्र आदी उत्सव येत असून विसर्जन मिरवणूकीदरम्यान वेळेचे आणि आवाजाचे बंधन पाळणे सर्वांसाठी आवश्यक आहे. ज्या डिजे चालकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्यास त्यांच्यावर पर्यावरण रक्षण तसेच ध्वनीप्रदुषण कायद्यान्वये 1 लाखाचा दंड तसेच 5 वर्षांचा कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखून उत्सव साजरे करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी केले. येथील बाजारपेठ पोलीस स्थानकात बुधवार 2 रोजी सायंकाळी शहरातील डिजे चालकांची बैठक घेर्‍यात आली. याप्रसंगी बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहर पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक राहुल पाटील उपस्थित होते.

ध्वनी प्रदुषणासंदर्भात न्यायपालिका जागरुक

यावेळी डिवायएसपी नीलोत्पल यांनी सांगितले की, ध्वनी प्रदुषणासंदर्भात न्यायालय अधिक जागृत झाले असून यासंदर्भात आम्हालाही वारंवार जाब विचारले जातात. उत्सव काळात तरुण पिढी अतिउत्साहाच्या भरात असते. त्यामुळे त्यांच्याकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला आमच्या सहकार्याची गरज भासते, त्याप्रमाणे तुमच्याकडूनही आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. सध्या पर्यावरणासंदर्भात यंत्रणा अधिक सतर्क झालेली आहे. कुणाला आपल्याकडून त्रास होणार नाही याचे भान राखण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

डिजेऐवजी ऑक्टोपॅड वापरा
उत्सव काळात शहरातील प्रमुख स्थळ व प्रमुख मंडळ परिसरातील ध्वनी मर्यादेची तपासणी केली जाईल. साधारण वेळेत असलेली मर्यादा व उत्सव काळात असलेली ध्वनीमर्यादा पाहणी करुन ध्वनी मर्यादा वाढलेली दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आम्हाला कुणाचाही रोजगार हिरवायचा नसून डिजे चालकांनी कुठलीही म्युझिक सिस्टीम न वाजवता केवळ ऑक्टोपॅड किंवा बॅन्जोचा वापर करावा, अनुचित प्रकार करुन शहराची बदनामी होणार नाही याचे प्रत्येकाने भान राखावे. तसेच मिरवणूकीदरम्यान आपल्या वाहनांची वाहतुक शाखेकडून परवानगी काढून घ्यावी, मिरवणूकीदरम्यान वाहतुक शाखेतर्फे प्रत्येक मंडळाच्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये कागदपत्रांची पुर्तता न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. यात आपले होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी अगोदरच खबरदारी घेऊन परवानगी घेणे बंधनकारक असल्याचेही नीलोत्पल यांनी यावेळी सांगिलते.

आवाज मर्यादा पाळा
विसर्जन मिरवणूकीत डिजेला बंदी असून केवळ ऑक्टोपॅडला परवानगी देण्यात आली आहे. याचा आवाज हा 50 ते 55 डेसिबलच्या आतच असावा आवाजाची मर्यादा वाढल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. ध्वनीमापक यंत्राद्वारे प्रत्येक डिजेच्या आवाजाची तपासणी करण्यात येणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कितीही दबाव टाकला तरी डिजे चालकांनी आवाज मर्यादेपेक्षा जास्त वाढू देऊ नये अन्यथा पुढील कारवाईस सामोरे जाण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी केल्या.