राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकरांचा यांचा घणाघात
जळगाव – सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत घरकुलमुळे मला संधी मिळाली नाही. त्यामुळे शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचे नशिब फळफळले. मला संधी मिळाली असती तर गुलाबराव पाटील यांना निवडणुकीत राम द्यावा लागला असता असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत चढविला.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काल एका कार्यक्रमात गुलाबराव देवकरांच्या काळात रस्त्यांची निकृष्ट कामे झाली असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महाआघाडीचे सरकार आहे. गुलाबराव पाटील यांना पालकमंत्री करण्यासाठी जितका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आशीर्वाद आहे तितकाच तो पवार साहेब, अजितदादा आणि सोनिया गांधींचाही आहे. कुठल्याही कार्यक्रमात बोलतांना त्यांनी आघाडी धर्माचे भान ठेवावे असा टोला त्यांनी लगावला. माझ्या कार्यकाळात झालेली कामे आजही अपुर्णावस्थेतच आहेत. मागच्या पाच वर्षातही गुलाबराव पाटील मंत्री होते. मात्र पाच वर्षात मतदारसंघात मी सुरू केलेले एकही काम यांच्या काळात पुर्ण झाले नाही. निव्वळ थापा मारण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप गुलाबराव देवकर यांनी केला.
तर समन्वय समितीकडे तक्रार करू
राज्यात आघाडी धर्म टिकावा म्हणून समन्वय समिती नेमण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा माझ्यावर आरोप केल्यास आणि आघाडी धर्म न पाळल्यास समन्वय समितीकडे आपण तक्रार करणार असल्याचेही माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.