भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता उलथवून टाकण्यात आणि कॉंग्रेसची सत्ता आणण्यात कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशच्या राजकारणातून सिंधिया यांना दूर करण्यात येत असल्याची चर्चा सुरु आहे. सिंधिया यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या एका समर्थक नेत्याने जर मध्य प्रदेशच्या राजकारणातून सिंधिया यांना दूर केल्यास मी माझ्या पाचशे कार्यकर्त्यांसह पक्षाचा राजीनामा देईल अशी धमकीवजा इशारा दिला आहे.
अशोक दांगी बगदा असे या नेत्याचे नाव आहे. अशोक दांगी हे दतिया जिल्ह्याचे कॉंग्रेस अध्यक्ष आहेत. दांगी यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यातून त्यांनी ही मागणी केली आहे. १३ वर्षानंतर मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता जाऊन कॉंग्रेसची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव चर्चेत होते. मात्र पक्षश्रेष्टीने कमल नाथ यांना मुख्यमंत्रीपद दिले. त्यानंतर सिंधिया हे पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे.