जळगाव : अनेक दिवसांपासून मंजुर झालेले विकास कामे अधिकारी कर्मचार्यांच्या उदासिनतेमुळे प्रलंबीत असून शासकीय योजनेचा लाभ तळागाळातील जनतेपर्यत पोहचत नसल्यामुळे शासकीय कर्मचार्याबद्दल तक्रारी वाढली आहे. प्रलंबीत कामे लवकरच पुर्ण करा अन्यथा शिवसेना स्टाईल दाखवावी लागेल अशी तंबी राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजिंठा विश्रामगृहात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकी प्रसंगी शासकीय अधिकारी कर्मचारी यांना दिली. मंत्रीपद मिळाला त्यामुळे शांत आहे याचा गैरफायदा घेऊ नका असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत आरोग्य, पेन्शन योजना, घरकूल, शौच्छालय बांधकाम, आदी प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह जळगाव तालुक्यातील तहसिलदार, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आदी हजर होते.
तीन वर्षापासून कामे प्रलंबीत
जळगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन बांधकामासाठी तसेच पुर्नबांधणीच्या कामाला तीन वर्षापासून प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. पिंपळेसिम, पिंपळे खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीला 2013 पासून प्रशासकीय मान्यता मिळालेली असतांना 2017 उजाडले परंतु हे कामे अजुनही मार्गी लागलेले नाही. तसेच मोहाडी येथे स्त्रियांसाठी 100 खाटांचा रुग्णालय बांधण्यास दोन वर्षापासून मान्यता मिळाली असतांना देखील कामपुर्ण झाले नसल्याचे उघड झाले आहे. शासकीय कर्मचारी आणि अधिकार्यांच्या उदासिनतेमुळे हे कामपुर्ण झाले नसल्याचे आढावा बैठकीतुन निष्पन झाले.
निधी असुनही सिटीसी स्कॅन मशिन नाही
जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीसी स्कॅन मशिन बसविण्यासाठी शासनाने 6 महिन्यापूर्वी 1 कोटी रुपये मंजुर केले असून अद्यापही अद्यापही सिटीसी स्कॅन मशिन बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सिटीसी स्कॅन मशिन बसविली गेली असती तर याचा आता पर्यत हजारो लोकांना लाभ मिळाला असता असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. फरशी बसविण्याचे काम बाकी आहे, असे क्षुल्लक कारण अधिकार्यांकडून देण्यात आले आहे.
हगणदारी मुक्त गावास दहा लाख
जळगाव तालुक्यातील गावे हगणदारी मुक्त झाल्यास आमदार निधीतुन 10 लाखाचा बक्षीस हगणदारी मुक्त गावास देण्यात येईल तसेच प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी एक गाव दत्तक घेऊन ते गाव हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प करावा. असे केल्यास एका वर्षात 20 ते 25 गावे हगणदारीमुक्त होतील असे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जागा उपलब्ध असूनही कामे अपुर्ण
पाळधी येथील आरोग्य उपकेंद्रासाठी राष्ट्रीय महामार्गावरील 75 लाख किंमतीची जागा आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी उपलब्ध असून देखील या ठिकाणी बांधकामाला सुरुवात झाली नसल्याने बांधकाम करण्यास का उशीर होत आहे? अशी थेट विचारणा करत गुलाबराव पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांना बैठकीत चांगलेच धारेवर धरले होते.