अन्यायकारक आदेशाची एसटी कृती समितीकडून होळी

0

पिंपरी-चिंचवड : एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळांमधील बस बांधणी व दुरुस्तीचे श्रमिक तास कमी केल्याच्या निषेधार्थ दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेच्या प्रवेशद्वारावर या आदेशाची होळी करण्यात आली. याविरोधात एसटी कामगार संघटना कृती समितीने एकजूट दाखवत प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचा निषेध केला. या आंदोलनात अध्यक्ष मधुकर नेहरकर, अनिल चव्हाण, खजिनदार संदीप रायकर, संघटक तुळशीराम मुंडे, प्रसिद्धीप्रमुख प्रमोद कानडे व कामगार मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.

श्रमिक तास कमी करण्याची शिफारस
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यात दापोडी, औरंगाबाद आणि नागपूर या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. यात तिन्ही ठिकाणी बस बांधणी केली जाते. या सर्व कार्यशाळांमधील कामाचा (टाईम व मोशन) अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक केली होती. या सल्लागाराचा अहवाल एसटी महामंडळाला प्राप्त झाला आहे. या अहवालात अ‍ॅल्युमिनिअम बस बांधणीचे 234 श्रमिक तास कमी करण्याची शिफारस केली आहे. या अहवालाची अंमलबजावणी करण्यास महामंडळाच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार एसटी महाव्यवस्थापकांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश तिन्ही मध्यवर्ती कार्यशाळा व्यवस्थापकांना दिले आहेत. ही बाब समजताच, हा कामगार कराराचा भंग असल्याने एसटी कर्मचार्‍यांनी याला विरोध दर्शविला आहे. याविरोधात एसटी कामगार संघटना, एसटी कामगार सेना, कास्ट्राईब संघटना, मनसे व संघर्ष ग्रुपने कृती समिती स्थापन करुन या निर्णयाला विरोध केला आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता सर्व कामगार कार्यशाळेच्या प्रवेशद्वारावर एकत्र जमा झाले. या सर्वांनी एसटी प्रशासनाचा निषेध करत, या अहवाल प्रतीची होळी केली.