अन्यायाविरोधात गणेश नाईक यांचा निर्धार मोर्चा

0

नवी मुंबई । सिडको, एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिका यांच्यामार्फत नवी मुंबईतील विविध घटकांवर सुरू असलेला अन्याय आणि नवी मुंबईकरांचे हित जपण्यात राज्य शासनाने चालवलेला हलगर्जीपणा याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली 10 मार्च रोजी कोकण भवन विभागीय कार्यालय, सिडको भवन, एमआयडीसी कार्यालय आणि नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजता बेलापूर येथील क्रोमा शोरूम किल्ले गावठाण येथून या धडक मोर्चाला सुरुवात होणार आहे. घणसोली, तळवली, गोठिवली, नेरुळ, कोपरखैरणे तसेच इतर भागातील गाव तसेच गावठाणांमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सिडकोची सातत्याने कारवाई सुरूच आहे. काळाच्या ओघात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर अन्यायकारक तोडक कारवाई सुरू आहे. दिघा, ईश्‍वकरनगर येथे सिडको व एमआयडीसीच्या जागेवरील सर्व सामान्यांची घरे सिडको, एमआयडीसी व पालिकेमार्फत तोडण्यात येत आहेत. या बांधकामांना नियमित करण्याचे उच्च न्यायालयात टिकेल, असे सुधारित धोरण आणू, असे आश्‍वासन देऊनही अद्याप राज्य सरकारने हे धोरण आणलेले नाही. 2015 पर्यंतच्या बांधकामांना संरक्षण देऊ असे सरकार एकीकडे सांगते आणि दुसरीकडे ही बांधकामे तोडत आहेत.

नवी मुंबईकरांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी राहण्याचे आवाहन
झोपडपट्टी पुनर्वसनाची कोणतीही योजना न आणता यादवनगर, तुर्भे स्टोर, ईश्‍वरनगर, यादवनगर, दिघा इत्यादी भागात एमआयडीसी, सिडको व महापालिका प्रशासन झोपड्या निष्कासित करण्याची कारवाई करत आहेत. गरीब झोपडपटटीवासीयांचे संसार रस्त्यावर आले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करीत जुनी आणि पौराणिक अशी सर्व धर्मीयांची धार्मिकस्थळे तोडली जात आहेत. सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाचा विषय प्रलंबित ठेवला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना देण्यात येणारे विद्यावेतन सिडकोने बंद केले आहे. शहरातील फेरीवाल्यांवर महापालिकेने वारंवांर कारवाई सुरू ठेवली आहे. अधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई होते आहे. त्यामुळे हातावर पोट भरणार्‍या या सर्व फेरीवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शैक्षणिक वर्ष संपत आले तरी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केलेले नाही. माथाडी कामगारांची घरे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गाळ्यांवर कारवाई सुरु आहे. शहरातील व्यापार्यांचच्या दुकानांना कारवाईच्या नोटीस धाडण्यात आल्या आहेत. एवढंच काय पण इमारतींना संरक्षण देणार्‍या शेड सोसायट्यांनी उभ्या केल्या आहेत. त्यांनाही पालिकेने नोटीस बजावल्या आहेत. नवी मुंबईकरांवरील अन्यायाची परिसीमा झाली आहे. नवी मुंबईच्या हिताचे निर्णय शासन घेत नाही. त्यामुळे या विरोधातील नवी मुंबईतील सर्व घटकांचा आक्रोश आणि चीड या निर्धार मोर्चात व्यक्त होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी दिली. या मोर्चात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी केले आहे.