येरवडा । महिलांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी सर्व घटकातील महिलांनी संघटीत होऊन अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचे मत मराठवाडा विकास महासंघटनेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र कसबे यांनी व्यक्त केले.
रक्षाबंधननिमित्त संघटनेच्या वतीने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे महिलांच्या वतीने रक्षाबंधन साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस उपनिरीक्षक एम. गोगडे, शहर कार्याध्यक्ष लक्ष्मी मोरे, शहर संघटक वृषाली वाघमारे, सरचिटणीस पूनम पोळ, शहर संघटना प्रमुख शोभा वणवे, उपाध्यक्षा पुष्पा निर्मळ, शशिकला मोरे, दीप्ती घोडके, अश्विनी कांबळे, वडगाव शेरी विधानसभा अध्यक्षा अक्षदा परदेशी, उपाध्यक्षा आशा चाफेकर, जीवन साबळे, अविनाश धिवार आदी यावेळी उपस्थित होते.
आज विविध क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात भरारी घेत असल्या तरी पण समाजात आज अशा अनेक महिला आहेत की, त्यांना सासरी अत्याचार व अन्यायाला सामोरे जावे लागते. अत्याचाराला अनेक महिला बळी पडत असून अनेकींना तर फक्त चूल आणि मूल या पलीकडे जगात काय चालले आहे याचा अद्याप ही थांगपत्ता लागलेला नाही, असे कसबे यांनी यावेळी सांगितले.
जनजागृतीची गरज
मुलगी शिकली तर देश वाचेल. भविष्यात कल्पना चावला, इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील अशा प्रकारच्या महान महिलांचा आदर्श ठेवावा. मुलींचा जन्मदर प्राण वाढविण्यासाठी आज देखील समाजात जनजागृती करण्याची गरज असून यासाठी महिलांसह पुरुषांनी या उपक्रमात सहभागी होण्याची काळाची गरज आहे, असे कसबे यांनी पुढे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वृषाली वाघमारे, पूनम पोळ यांनी मानले.