अन्याय, अत्याचाराविरोधात संघटीत होण्याची आज गरज : सतिष पेंदाम

0

जुन्नर । आदिवासी समाजातील वीर पुरुषांनी प्रत्येक लढ्यात बलिदान दिले आहे. त्याची जाण ठेवून प्रत्येक समाजबांधवाने आपला स्वाभिमान जपला पाहिजे. संघटीत होऊन अन्याय, अत्याचाराविरोधात उभे राहणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सतिष पेंदाम यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. समाजातील वीर पुरुषांना अभिवादन करण्यासाठी आदिवासी विचारमंच व संलग्न संघटनेच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अ‍ॅड. योजना वाजे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

स्वराज्यासाठी बलिदान
1650 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर कोळो महादेव व ठाकर समाजाच्या 1600 वीर पुरुषांनी उठाव केला होता. सरनाईक खेमा व त्याच्या सहकार्‍यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. या बलिदानाची आठवण म्हणून आपण आज एकत्र आलो आहोत. समाजासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे, असे पेंदाम यांनी यावेळी सांगितले. देशात आदिवासी समाजावर अन्याय होत आहेत. बळजबरीने आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. राघोजी भांगरे व इतर वीरांनी देशासाठी बलिदान दिले आहे, त्यांची आठवण यावेळी करून देण्यात आली.

कोळी चबूतर्‍याला अभिवादन
स्वराज्यासाठी बलिदान करणार्‍या आदिवासी वीरांची कमी नव्हती. एक लढवैय्या जमात म्हणून आदिवासी पुढे असायचे. मात्र, इतिहासकारांनी या जमातीला प्रसिद्धीपासून दूर ठेऊन त्यांची उपेक्षा केली. शिवनेरी किल्ला निजाम शहाच्या ताब्यात असताना सरदार रणदुल्ला खान याने स्वराज्यासाठी लढणार्‍या शुर आदिवासी जमातीला जरब बसविण्यासाठी 1600 जणांची कत्तल केली. या वीरांना अभिवादन करण्यासाठी स्मारकाजवळ राज्यभरातील आदिवासी बांधव एकत्र आले होते. यावेळी शिवनेरीवरील कोळी चबूतर्‍याला अभिवादन करण्यात आले.