मुंबई : सरकारवर ताशेरे ओढण्याचा एकही ‘मौका’ नाथाभाऊ सोडताना दिसत नाहीयेत. सोमवारी पुरवणी मागण्यांच्या चर्चेत एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या काळात मंजूर केलेल्या प्रकल्पांना स्थगिती आणि इतरत्र हलविल्याच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारची लक्तरेच काढली. प्रकल्प रखडले, महाविद्यालये इतरत्र हलविली या प्रकरणांमुळे नेमका अन्याय कुणावर होतोय? नाथाभाऊंवर होतोय की खान्देशावर? यामध्ये काय राजकारण आहे? असा खडा सवाल खडसे यांनी शासनाला विचारले.
प्रकल्प शिफ्ट होत आहेत
पुरवणी मागण्यांच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, मुक्ताईनगर शासकीय कृषि महाविद्यालय शिफ्ट करण्याचा घाट घातला जात आहे, हे महाविद्यालय करु नये. जळगाव जिल्ह्यातील संशोधन केंद्र रद्द का केले? पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ विभाजन समिती अहवालाचे काय झाले? 400 पानी अहवाल दिला होता तरी दोन वर्षे कारवाईला लागले? प्रकल्प का रखडवले? अशा प्रश्नांनी सरकारचे वाभाडे खडसे यांनी काढले.
…तर जमीन परत द्या
मुक्ताईनगर कृषि महाविद्यालयाला आम्ही आमच्या मालकीची 100 एकर जमीन दिली. यासाठी अजून निधी दिला नाही. तर जमीन परत देऊन टाका, असे खडसे म्हणाले. तूर संशोधन केंद्र जळगाव वरुन अकोल्याला का हलवले. केंद्राने आता स्थगिती दिली. अवजारे कृषी संशोधन केंद्र, टिश्यू कल्चर केंद्र स्थगीती. हॉर्टीकल्चर कॉलेज रखडवले का गेलेय? असाही सवाल त्यांनी केला. हा कोणावर अन्याय आहे? खान्देशावर की नाथाभाऊंवर? पोलिस प्रशिक्षण केंद्राचे काय झाले? राजकारण काय ते सांगा? असे ठणकावले. मी दिलेले एकही प्रकल्प रद्द होणार नाहीत याची शाश्वती मुख्यमंत्र्यांनी मला द्यावी असे खडसे म्हणाले.
कुठलाही प्रकल्प रद्द होणार नाही:- कृषिमंत्री
आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितलेले शासकीय पशुविद्यान महाविद्यालय, लिंबूवर्गीय संशोधन केंद्र यांसह बाकीचे सांगितलेले कुठलेही प्रकल्प रद्द केले जाणार नाहीत. मुक्ताईनगर कृषी महाविद्यालय संबंधी उद्या बैठक बोलावली आहे, त्यात निर्णय घेतला जाईल असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले. आपण जे सांगितलं त्यातला कुठलाही प्रकल्प रद्द होणार नाही. तसेच पीक विम्याची मुदत वाढविली जाईल, असेही कृषिमंत्री म्हणाले. तसेच जळगाव जिल्हयातील पशुविज्ञान विद्यालय हलविणार नाही असे आश्वासन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिले.