पुणे । दैनंदिन कामकाजाच्या जबाबदार्या आणि ताणतणावातून हलके-फुलके विनोद, विडंबन काव्य आणि संस्मरणीय गाण्यांनी नटलेला ‘हसरा श्रावण’ कार्यक्रम महापालिकेच्या अधिकारी आणि सेवकांच्या चेहर्यावर प्रसन्न हास्य उमटवून गेला. निमित्त होते; महापालिकेच्या सहआयुक्त, परिमंडळ 4 तसेच स्थानिक संस्था कर कार्यालयातील अधिकारी आणि सेवकांसाठी आयोजित हसरा श्रावण या कार्यक्रमाचे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह गंज पेठ येथे झालेला हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
एकपात्री संस्थेच्या कलाकारांसोबत
यामध्ये आम्ही एकपात्री संस्थेचे अध्यक्ष संतोष चोरडीया यांच्यासह उज्ज्वला कुलकर्णी, वंदन नगरकर, चंद्रकांत परांजपे, राजेश शिंगाडे, अनुपमा खरे, अश्विनी बीडकर आणि बण्डा जोशी हे कलाकार सहभागी झाले होते. विनोदी किस्से, धमाल गाणी, विंडबन काव्य आणि रंजक मिमिक्री यांनी रंगलेला कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
ताणतणाव दूर करण्यासाठीच
वाढते दैनंदिन ताणतणाव दूर करण्यासाठी आणि जीवनाकडे मिश्किलपणेही बघण्याचा दृष्टिकोन देण्याच्या उद्देशाने ‘हसरा श्रावण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सहआयुक्त संध्या घागरे, सहआयुक्त संजय गावडे, कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर आदी उपस्थित होते.