अन्.. चोरट्यांना दोन तासातच अटक

0

जळगाव। सुप्रिम कॉलनी परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून जात असलेल्या तरूणाला मारहाण करून दोघांनी मोबाईल व तीनशे रूपये हिसकावून बळजबरीने चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली होती. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी दोन तासातच दोन्ही चोरट्यांचा तपास लावून अटक केली आहे. यातच त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
सुप्रिम कॉलनी परिसरातील पोलिस कॉलनी येथील तरूण रोहिदास नारायण सोनवणे (वय-17) हा सोमवारी रात्री 11.30 वाजता परिसरातील रामदेवबाबा मंदिराजवळून जात असतांना त्याला मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरूणांनी अडवून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याजवळी सहा हजार रूपये किंमतीचा मोबाईल व खिशातील तीनशे रुपये असे बळजबरीने हिसकावून चोरून नेले. यानंतर रोहिदास याने तातडीने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत घडला प्रकार सांंगितला व चोरट्यांचा वर्णन पोलिसांना सांगितला. वर्णनाच्या आधारावर एमआयडीसी पोलिस कर्मचारी तुकाराम निंबाळकर, गोविंदा पाटील, परेश जाधव यांनी सुप्रिम कॉलनीत चोरट्यांचा शोध घेतला. त्यानंतर सुप्रिम कॉलनीतील दिनकर उर्फ पिन्या रोहिदास चव्हाण व प्रेमसिंग उर्फ काल्या शिव राठोड हेच चोरटे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना सुप्रिम कॉलनीतून ताब्यात घेतले. यातच एमआयडीसी पोलिसांना घटना घडल्याच्या दोन तासातच चोरट्यांना पकडण्यात यश आले.