अन् त्याला अश्रू झाले होते अनावर..!

0

विम्बल्डन । अस म्हणतात की मोठे यश मिळाल्यावर आपसूकच डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहू लागतात. असाच काहीसा नजारा रविवारी विम्बल्डनमधील पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीनंतर पहायला मिळाला. दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर तिसर्‍यांदा विम्बल्डन जिंकल्यावर कोर्टमध्ये रडत असल्याचे पहायला मिळाले. 35 वर्षीय फेडररने आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक स्पर्धा जिंकल्या असतील, पण तिसर्‍यांदा विम्बल्डंन जिंकल्यावर तो कमालीचा भावुक झाला होता. फेडररचा रडतानाचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. विम्बल्डनच्या आयोजकांनी स्पर्धेच्या अधिकृत ट्विटरपेजवर हा व्हिडिओ अपलोड केला असून तो जगभरातील टेनिसप्रेमींचा पसंतीस उतरला आहे. फक्त काही तासांच्या कालावधीत सुमारे 20 हजारांहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला. फेडररने क्रोएशियाच्या मरिन सिलीचला हरवत वर्षातील तिसर्‍या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या सामन्यातील पहिल्या आणि तिसर्‍या सेटमध्ये सिलीचने फेडररला झुंजवण्याचा अपयशी प्रयत्न केला.

यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणार्‍या फेडररने 11 व्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवत विजेतेपद मिळवले. याआधी 2014, 2015 मध्ये फेडररने अंतिम फेरी गाठली होती. पण, दोन्हीवेळा त्याला सर्बियाच्या नोवाक जोकोव्हीचकडून पराभूत व्हावे लागले. 2016 मध्येही फेडररचा विम्बल्डनमधील प्रवास उपांत्य फेरीतच संपुष्टात आला. तेव्हा कॅनडाच्या मिलॉस राओनिकने त्याचे आव्हान संपुष्टात आणले होते. वाढत्या वयामुळे फेडररचा वाट चुकलेला असा उल्लेख होऊ लागला होता. पण या गट्सी खेळाडूने जोरदार पुनरागमन करत आपला लौकिक कायम ठेवला. फेडररने याआधी 2003, 04, 05, 06,07,09 आणि 2012 मध्ये विम्बल्डंन जिंकले होते.

सिलीचचे दुसरे ग्रॅण्डस्लॅम हुकले
पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा मरिन सिलीच या सामन्याच्या निमित्ताने कारकिर्दीतल्या दुसर्‍या ग्रॅण्डस्लॅम विजयाच्या उंबरठ्यावर होता. पण सेंटर कोर्टवर पहिल्यांदाच खेळणार्‍या सिलीचला फेडररने टिकाव धरू दिला नाही. ग्रासकोर्टचा बादशहा फेडररने दुसरे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचे सिलीचचे स्वप्न यशस्वी होऊ दिले नाही. 2014 ते 2016 दरम्यान सिलीचने सलग तीन वर्षे विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रवास केला होता. यंदा प्रथमच त्याने त्यापुढे मजल मारली.

19 वे अजिंक्यपद
रॉजर फेडररचे हे 19 वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या शर्यतीत त्याने स्पेनच्या रफाएल नदालला चार विजयांनी मागे टाकले आहे. याशिवाय सवारत जास्त वय असताना विम्बल्डन जिंकण्याचा पराक्रम आणि विक्रम फेडररने केला आहे.

विम्बल्डन चषक स्वीकारण्याच्या वेळीस फेडररचे वय 35 वर्षे 342 दिवस इतके होते. या आठव्या विजयासह फेडररने आपला समकालीन टेनिसपटू पीट सॅम्प्रस आणि ब्रिटनचे टेनिसपटू विल्यम रेनशॉ यांचा विक्रम मोडला.

सॅम्प्रस आणि रेनशॉ यांनी सात विजेतेपदांचा विक्रम स्थापित केला होता. या आठ विजेतेपदांशिवाय फेडररने पाच वेळा ऑस्ट्रेलियन, एक वेळ फ्रेंच ओपन आणि पाच वेळा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली आहे.

मरे, हिंगीस जोडीला मिश्र दुहेरीचे विजेतेपद
ब्रिटनचा जेमी मरे आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिन हिंगीस या जोडीने गतविजेत्या हेन्री कॉन्टीनेन आणि हेदर वॅटसन या जोडीचा पराभव करत विम्बल्डंनमधील मिश्र दुहेरीच्या लढतींचे विजेतेपद मिळवले. मरे, हिंगीस जोडीने हा सामना 6-4, 6-4 असा सहज जिंकला. विम्बल्डनमध्ये एकेरीचे विजेतेपद मिळवणार्‍या हिंगीसने तब्बल 20 वर्षानंतर स्पर्धेत विजय मिळवला. मैदानलगतचे फटके हे हिंगीसचे खास मानले जाते. पण या सामन्यात ते फटके पहायला मिळाले नाहीत. मरेचेही हे 10 वर्षांच्या खंडानंतर मिळवलेले मिश्र दुहेरीतील दुसरे विजेतेपद आहे. याआधी त्याने सर्बियाच्या एलेना जाकोविचसह ही स्पर्धा जिंकली होती.