अन् त्याला कळलेही नाही

0

2004 मध्ये कुलदीपच्या वडिलांनी त्याला कपिल पांडेंकडे नेले. त्यावेळी कुलदीपवर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसिम अक्रम नावाचे गारुड बसले होते. कुलदीपलाही अक्रमप्रमाणे वेगवान गोलंदाज म्हणून लौकिक कमवायचा होता. पांडेंनी त्याला वेगवान गोलंदाजीचे धडे देण्यास सुरुवात केली. जवळपास एक आठवडाभर त्याच्याकडून सराव करून घेतल्यावर पांडेंना त्याच्यात चमक पाहायला मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सहजच म्हणून त्याला फिरकी गोलंदाजी करायला सांगितली. तेव्हा चेंडूचा टप्पा आणि त्याचे वळण बघून पांडेंनी ठरवलं, बस्स! याला फिरकी गोलंदाजच करायचे. त्यांच्या सांगण्यावरून कुलदीपने काही दिवस फिरकी गोलंदाजी केली. पण काही दिवसांनी मात्र त्याचा संयम संपला आणि रडतच त्याने मी यापुढे गोलंदाजी करणार नाही, असे पांडेंना सांगितले. पांडे काही कुलदीपच्या रडण्याला बधले नाहीत आणि शनिवारी धरमशाळेत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक अध्याय लिहिला गेला.

उत्तर प्रदेशकडून खेळताना कुलदीपने 16 आणि 19 वर्षांखालील संघातून खेळताना सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. पण रणजी संघातून खेळण्यासाठी मात्र, त्याला वाट पाहावी लागली. ऐन भरात असताना, केवळ पीयूष चावला संघात असल्यामुळे कुलदीपला उत्तर प्रदेशच्या रणजी संघात जागा मिळाली नाही. संघात निवड होत नाही म्हणून कुलदीप नाराज झाला नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा कुलदीपने त्याचे सोने करत आपल्या नावाची दखल घ्यायला लावली. वयोगटांच्या स्पर्धांमध्ये कुलदीपची चायनामन गोलंदाजी फलंदाजांसाठी डोकेदुखी झाली होती. त्यावेळी कुलदीपला आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघातून खेळण्याची संधी मिळाली. सुनील नारायण, पीयूष चावला या संघात असल्यामुळे अंतिम अकरा जणांमध्ये कुलदीपला खेळायला मिळाले नसले, तरी या दोघांमुळे त्याची गोलंदाजी परिपक्व झाली हे नाकारता येणार नाही. यादरम्यान कुलदीपला एक मोठी संधी मिळाली. 2014 मधील वेस्ट विंडीजविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कुलदीपची भारतीय संघात निवड झाली. पण, यावेळीदेखील त्याला बॅकबेंचवर बसायला लागले.

एकीकडे ज्युनिअर क्रिकेटमध्ये कुलदीप छाप पाडत असताना उत्तर प्रदेश संघातील त्याचा वरिष्ठ सहकारी पीयूष चावलाची चमकही फिक्की पडत चालली होती. त्यादरम्यान 2014 मध्ये त्याला मध्य विभागाकडून कुलदीप दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळायची संधी मिळाली. त्यावेळी त्याने 56 धावांमध्ये 3 विकेट्स मिळवल्या. त्यानंतर यथावकाश कुलदीपने रणजी करंडक स्पर्धेतही पदार्पण केले. यंदाच्या रणजी हंगामात कुलदीपने सहा सामन्यांमधून 27 विकेट्स मिळवत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आघाडीच्या दहा गोलंदाजांमध्ये त्याने स्थान मिळवले. पहिल्याच कसोटी सामन्यात चार विकेट्स मिळवणारा तो जगातील तिसरा चायनामन गोलंदाज आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये कुलदीपला पहिली विकेट चायनामन चेंडूंने नाही, तर फ्लिपर चेंडूंने मिळवून दिली. याबाबत कुलदीपने दिलेली प्रतिक्रियाही बोलकी होती. कुलदीप म्हणाला, उनकी सिखाई, उनकोही आऊट करने मे मजा आया। याचे सारे श्रेय जाते ते शेन वॉर्नला. पुण्यातील कसोटी सामन्यात भारताचे पानिपत झाले. पण या सामन्याच्या दरम्यान संघाचा मार्गदर्शक अनिल कुंबळेने कुलदीपची महान गोलंदाज शेन वॉर्नशी भेट घालून दिली. याभेटीत वॉर्नने त्याला काही सूचना दिल्या. त्यात ओळख नसलेला चेंडू टाकण्याचा सल्लाही होता. कुलदीपची ओळख चायनामन गोलंदाज अशी, पण त्याने सुरुवातीला चायनामन चेंडू टाकलेच नाहीत. तो फ्लिपर गोलंदाजी करत होता अन् फलंदाज चायनामन चेंडूंच्या आशेने खेळला अन् बाद झाला. फिरकी गोलंदाजांना मदतगार नसलेल्या खेळपट्टीवर कुलदीपने ज्या काही विकेट्स मिळवल्या त्या प्रत्येक फलंदाजासाठी सापळा तयार केला होता. पीटर हॅड्सकॉबला पहिला चेंडू गोंधळात सापडेल असा टाकला. त्यानंतर चायनामन चेंडूवर त्याने त्याच्या यष्ट्या वाकवल्या. ग्लेन मॅक्सवेलची विकेट मिळवताना तर त्याने लागोपाठ दोन गुगली चेंडू टाकले. यातील पहिल्या गुगलीवर मॅक्सवेलने चौकार मारला. दुसर्‍या गुगलीने मात्र मॅक्सवेलची दांडी गुल केली. गुगली, चायनामन चेंडू गोलंदाजाला विकेट मिळवून देतात हे खरे असले, तरी काही वेळा या चेंडूंवर फलंदाजांचा मारही बसतो. हा सिद्धांत कुलदीपलाही मान्य आहे. जर फिरकी गोलंदाजांनी धावा दिल्या नाहीत तर त्याला विकेट्स कशा मिळणार, हा साधा प्रश्‍न कुलदीप पटकन आपल्यासमोर टाकतो. त्यामुळे भविष्यात एखाद्या सामन्यात त्याच्या गोलंदाजीची धुलाई होत असल्याचे पाहायला मिळाली, तरी नाराज होऊ नका. त्याच्या गोलंदाजीत एवढे वैविध्य आहे की तो फलंदाजांवर वर्चस्व मिळवणारच.