जळगाव । जळगाव पाचोरा बसमध्ये चढताना महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा मोबाईल भामटयाने लंपास केल्याची घटना गुरूवारी दुपारी नवीन बसस्थानकावर घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बस जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हलविण्यात आली. परंतु तपासात मोबाईल मिळून आला नाही. परंतू, सुनिता हिने मोबाईल चोरीबाबत जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील नवीन बसस्थानकावर भुरट्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असल्याने या ठिकाणी मोबाईल चोरीसह दागिने व पैसे चोरीला जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे.
सात हजार किंमतीचा मोबाईल
सुनिता रघुनाथ काटोले ही शिरसोली येथे वास्तव्यास असून ती जळगाव येथील धनाजी नाना महाविद्यालयात एम.एस. डब्ल्यू. च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. गुरूवारी दुपारी अभ्यासक्रमानिमित्त सुनिता जिल्हा कारागृहात विद्यार्थ्यांसह गेली होती. त्यानंतर महाविद्यालय सुटल्यानंतर ही विद्यार्थीनी दुपारी नवीन बसस्थानकावर बसच्या प्रतिक्षेत होती. यातच एम.एच.20 बी.एल. 1836 या क्रमांकाची एस.टी. बस नवीन बसस्थानकात उभी झाल्यावर बसमध्ये चढताना प्रवाश्यांची गर्दी केली. या गर्दीतून बसमध्ये विद्यार्थीनी चढत असताना भामटयाने गर्दीचा फायदा घेत तिच्या जवळली सुमारे साडेसहा ते सात हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविला.
पोलिसांची शोधमोहीम
ही घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. मोबाईल चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यार्थीने आजूबाजूला शोध घेतला. नंतर तिने चालक ज्ञानेश्वर पाटील तसेच वाहक बी.पी. सुरवाडे यांना मोबाईल चोरीस गेल्याची माहिती दिली. चालक पाटील यांनी घटनेची माहिती कट्रोलकडे दिली. नंतर प्रवाश्यासह बस जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये हलविण्यात आली. प्रकार लक्षात आल्यावर नाना तायडे, अजित पाटील, योगेश ठाकुर, जितेंद्र सुरवाडे यांनी शोध मोहिम राबविली. यानंतर प्रत्येक प्रवाश्याला बसखाली उतरवून तपासणी करण्यात आली. तर बसमधील विद्यार्थ्यांच्या बॅगा देखील तपासण्यात आल्या. परंतु मोबाईल मिळून आला नाही.