अन् बालकामगारांना मिळाली शिक्षणाची संधी

0

येरवडा । शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुणे शहरातच बालकामागारांचे प्रमाण वाढले होते. त्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने अ‍ॅड बस्तू रेगे व त्यांच्या पत्नी अ‍ॅड. पल्लवी रेगे यांनी पुढाकार घेऊन या बालकामगारांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज समाजातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर आदी जिल्ह्यात राज्यासह परराज्यातील नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी दगडखाणीत काम करत आहेत. परंतु येथील धुळीमुळे अनेकांना दमा आदी अशा महाभयंकर आजाराला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. तसेच त्यांच्यात व्यसनाचे प्रमाणही खूप असते. त्यामुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी अनेक मुले दगडखाणीत काम करतात. परिणामी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी रेगे दांम्पत्याने पुढाकार घेतला. महिलांची संघटना उभारून दारूबंदी विरोधात आवाज उठविला.

पालकांमध्ये जनजागृती
दगडखाणीवरील कामगारांना रेशनकार्ड काढून देणे, त्यांची नावे मतदार यादीत नोंदवणे, व्यसन मुक्तीसाठी जनजागृती करणे अशी सामाजिक कामे करण्यावर त्यांनी भर दिला. दगडखाणीत काम करणार्‍या कामगारांच्या कुटुंबातील मुलांचे लक्ष शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी पालकांमध्ये जनजागृती केली. तसेच जे अशिक्षित कामगार आहेत. त्यांच्यासाठी रात्रशाळा सुरू करून त्यांना देखील सुशिक्षित केले. यानंतर 1997 साली मुलांसाठी पाषाण शाळा उघडल्याने आज समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

60 पाषाण शाळा
आज जिल्ह्यात 28,530 दगडखाण कामगार असून 3 ते 14 वयोगटातील 3074 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी 17 बालशिक्षण केंद्र उभारून 60 पाषाण शाळा व 2 माध्यामिक पाषाण शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे संतुलन संस्थेच्या माध्यमातून बाल शिक्षण केंद्र, पाषाण शाळा, कामगारांसाठी आरोग्य सेवा, याबरोबरच महिलांचे सबलीकरण करण्यात आले आहे. असंघटित कामगारांची संघटना उभारून त्यांच्याविरोधात होणार्‍या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यात येत आहे. तर कामगारांना कायदा सल्ला व मार्गदर्शन ही करण्यात आहे. या सामाजिक कार्यातून रेगे यांनी समाज पुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.