धूर निघाल्यानंतर पैठण-भुसावळ एशियाड बणमध्ये प्रवाशांची तारांबळ : प्रवाशांच्या सतर्कतेनंतर कुर्हेपानाचे बसस्थानकावर थांबवली बस : अन्य बसेसने प्रवासी रवाना
भुसावळ : पैठण आगाराची पैठण-भुसावळ बस जामनेरमार्गे भुसावळकडे येत असताना अचानक बसमधून धूर येत असल्याचे पाहून प्रवाशांनी आरडा-ओरड करून बस थांबवली व मिळेल त्या जागेवरून प्रवाशांनी बसबाहेर उड्या टाकल्या. कुर्हेपानाचे गावाजवळ 26 रोजी दुपारी 12.40 वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर प्रवाशांचा थरकाप उडाला मात्र सुदैवाने बस चालकाने बसची तपासणी केल्यानंतर बसला आग लागली नसल्याचे स्पष्ट करीत बसच्या मागील चाकाचे लायनर जाम झाल्याने धूर निघत असल्याचे सांगितल्यानंतर प्रवाशांचा जीवात जीव आला.
अन् प्रवाशांचा उडाला थरकाप
पैठण-भुसावळ एशियाड बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.3897) ही बुधवारी दुपारी 12.10 वाजेच्या सुमारास जामनेर येथून सुमारे 43 प्रवाशांना घेवून भुसावळकडे मार्गस्थ झाल्यानंतर गाडी कुर्हेपानाचे गावाजवळ आल्यानंतर बसच्या पाठीमागील भागात बसलेल्या प्रवाशांना बसच्या चाकांमधून धूर निघत असल्याने जळाल्याचा वास येताच त्यांनी आरडा-ओरड करून बस कुर्हा बसस्थानकाजवळ थांबवली तर काही प्रवाशांनी बसला आग लागल्याचे समजून बसच्या संकटकालीन खिडकीतून बाहेर उड्या टाकल्या. यावेळी प्रवाशांसह वाहक व चालक यांनी बसमधून खालीत उतरत तपासणी केली असता बसच्या मागील चाकाचे लायनर जॅम झाल्यानेमुळे व घर्षणामुळे हा धूर निघत असल्याचे लक्षात आले. यानंतर बस काही काळ कुर्हा बसस्थानकावर थांबवून ठेवण्यात आली तसेच संपूर्ण बसमधील 43 प्रवाशांना अन्य दोन बसमधून भुसावळकडे रवाना करण्यात आले.