अन् साधन सामग्री नसतांना राष्ट्रवादीला खडसेंची गरज भासली

0

जळगाव: जिल्ह्यात गेल्या 20 वर्षापासून भाजपाचेच खासदार निवडून येत आहे. पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातून दोन खासदार मागितले होते. मात्र, ते देण्याइतपत कष्ट देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी घेतले नाही. तसेच 2009 चा अपवाद वगळता इतर वेळी भाजपा आणि सेनेचा जिल्ह्यात दबदबा राहिला आहे.

खा. शरद पवार यांच्या दृष्टीने जळगाव हा राज्याच्या राजकारणाला दिशा देणारा जिल्हा आहे. लोकनेते स्व. बाळासाहेब चौधरी, स्व. मुरलीधर पवार, स्व. प्रल्हादराव पाटील, स्व. देविदास भोळे, स्व. हरिभाऊ जवरे, स्व. निंबाजी पाटील, स्व. वासुदेव चांगरे, माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी खा. अ‍ॅड. वसंतराव मोरे यांना सोबत घेऊन जिल्ह्यात पवारांनी एकेकाळी राज्य केले आहे. त्यानंतरच्या कालावधीत या जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेनेची ताकद वाढली ती आजतागायत कायम आहे. कारण, राष्ट्रवादीतील सध्याचे पुढारी हे ‘आपली गल्ली, आपलं मैदान’ एवढ्यापुरतेच मर्यादीत राहिले आहेत. त्यामुळे खा. शरद पवार यांना जळगाव जिल्ह्यात पुन्हा गतवैभव मिळविण्यासाठी एका खमक्या नेतृत्वाची गरज होती. नुकताच भाजपाला सोडचिठ्ठी देत एकनाथराव खडसे यांनी कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंचा प्रवेश हा उत्तर महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी फायदेशीर ठरेल अशा स्वरूपाची काही गणिते आखली गेली असतील.

तोडपाणीचा आरोप अन् पवारांकडून प्रवेशाला ग्रीन सिग्नल
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सन 2009 मध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी खा. शरद पवार यांनी ‘विरोधक सकाळी प्रश्न विचारतात आणि सायंकाळी तोडपाणी करतात’ असा आरोप करून मोठी खळबळ उडवून दिली होती. या आरोपाने अस्वस्थ झालेल्या खडसेंनी पवारांचे शाहीद बल्वा कनेक्शनचे उट्टे काढले होते. तेव्हापासून खडसे आणि पवार असा संघर्ष राज्याने पाहिला. मात्र 2014 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या दीड वर्षात एकनाथराव खडसे यांना भाजपाने दूर करायला सुरवात केली. सन 2019च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसेंना उमेदवारी नाकारून शेवटचा घाव भाजपाकडून घालण्यात आला. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र या प्रवेशाविषयी खा. शरद पवारांना विचारणा झाल्यानंतर ‘खडसेंचे समाधान करण्याइतकी साधन सामग्री नसल्याचे’ विधान केले होते. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात मुंबई येथे झालेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चाचपणी खुद्द खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या बैठकीत काहींनी प्रवेशाला प्रतिकुलता दर्शविली होती. मात्र ‘तुम्ही किती पक्ष वाढविला?’ या पवारांच्या एकाच प्रश्नाने जिल्ह्याचे पदाधिकारी निरूत्तर झाले आणि खडसेंच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाला. साधन सामग्री नव्हती तर मग खडसेंचा प्रवेश का झाला? हा संशोधनाचाच भाग आहे.

पक्षवाढीचे खडसेंसमोर आव्हान
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा भारतीय जनता पार्टीत कधीकाळी एकछत्री अंमल होता. खडसेंच्या शब्दाला दिल्लीतही वजन होते. मात्र राजकीय महत्वाकांक्षेमुळे खडसेंचे खच्चीकरण झाले. आता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून परिचयाला येत आहे. जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी वाढविण्याचा शब्द त्यांनी पवारांना दिला आहे. मात्र, जळगाव जिल्हा राष्ट्रवादीत 10 नेत्यांची तोंडे, दहा दिशेला असल्याने त्यांना एकत्र करणे हे मोठे आव्हानच आहे. कुणी कितीही नाही म्हटले तरी राजकारणात सामाजिक गणितेही विचारात घेतली जातात. राष्ट्रवादी काँग्रेसवर मराठ्यांचा पक्ष म्हणून शिक्का आहे. हा शिक्का पुसण्यासांठी खडसेंचा प्रवेश महत्वाचा ठरतो. एकनाथराव खडसे हे लेवा समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी भाजपाला बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळवून दिली होती. आता राष्ट्रवादीतही अशाच काही स्वरूपाचे काम करून सर्व प्रमुख पदाधिकार्‍यांना एका माळेत बांधावे लागणार आहे. त्यासाठी खडसेंनाही राष्ट्रवादीत सर्वमान्य नेता व्हावे लागणार आहे. जळगाव जिल्ह्यात खा. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांची पुनर्भरणी करणे हे खडसेंसाठी निश्‍चितपणे आव्हानात्मक ठरणार आहे.
(समाप्त)