महाड : अपंग व्यक्तींना देण्यात येणारे अपंगत्वाचे दाखले जिल्ह्याच्याच ठिकाणी मिळत असल्याने हे दाखले मिळविण्यासाठी अपंगांची ससेहोलपट होत असते. अपंगांची ही गैरसोय दूर व्हावी यासाठी महाड विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांची भेट घेऊन अपंग व्यक्तींना देण्यात येणारे दाखले तालुकास्तरावर अधिकारी वर्गाने भेट देऊन द्यावेत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावर निर्णय झाल्यास जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील अपंग व्यक्तींना दिलासा मिळणार आहे.
महिन्यातून एकदा तालुका स्तरावर दाखले वाटप करण्याची मागणी
अपंग व्यक्तींना दिले जाणारे दाखले हे प्रत्येक जिल्ह्याच्या शल्यचिकित्सक यांच्या मार्फत दिले जातात. रायगड जिल्ह्यातील अपंग व्यक्तीला दाखले घेण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात जावे लागते त्यातच महाड पोलादपूर हे तालुके अतिदुर्गम असल्याने 200 ते 300 किमी अंतर प्रवास करून जावे लागते त्यामुळे त्यांना इतका प्रवास करणे शक्य नसल्याने अपंगांना दाखल्याविना अनेक लाभ पासून वंचित राहावे लागते या करिता महिन्यातून एकदा तालुका स्तरावर महाड येथील ट्रामा केअर सेंटर मध्ये दाखले देण्याकरिता तारीख निश्चित करण्याकरिता संबधीताना आदेश देण्यात यावेत अशी मागणी आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.