अपंगत्वावर मात करीत कलेची साधना

0

इच्छाशक्ती, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर सदानंद गोळे हा कलाकार गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. लहाणपणापासून एका पायाने अधू असलेल्या या कलाकाराने अपंगत्वावर मात करीत संगीत कलेचा ध्यास घेतला. शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने सुरू असलेली सदानंद गोळे यांची वाटचाल निश्‍चितच दखलपात्र अशी आहे.

कौन कहता है,
आसमॉपर सुराक नही होता।
जरा एक पत्थर
तबीयतसे उछालो तो यारो॥

या विधानाचा अर्थ एवढाच की, अशक्य असे काही नाही. एखाद्याने मनात काही आणले तर तो काहीही करू शकतो. वरील विधानाची प्रचिती देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सदानंद गोळे या कलावंताचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. खेळण्या-बागडण्याच्या वयात अवघ्या नवव्या वर्षी पोलिओ झाल्याने सदानंदजी एका पायाने अधू झाले. परंतु, या आघाताने खचून न जाता अपंगत्वावर मात करीत त्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली. दरम्यान, त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी संगीत कलेचा आधार घेतला आणि आजच्या घडीला एक उत्तम कलाकार म्हणून त्यांचा या क्षेत्रात नावलौकिक झालेला आहे.
पुण्याजवळील पुरंदर तालुक्यातील माहूर या गावी जन्म झालेल्या सदानंदजींना लहाणपणापासून तबला वादनाचे आकर्षण होते. प्रारंभीच्या काळात डब्यांवर वाजवत त्यांनी तबला वादनाची हौस भागवली. गावाकडे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबईला आले. घाटकोपर येथे वास्तव्याला असताना प्रदीप दीक्षित यांच्याकडे काही दिवस तबला वादनाचे धडे गिरवले. सदानंदजी यांचे बंधू हनमंत गोळे हे ऐरोली येथे रहात होते. त्यांनी सदानंदजींना ऐरोली येथे बालावून घेतले आणि 1988 साली ‘स्वरगंधा’ या नावाने त्यांना संगीताचा क्लास सुरू करायला लावला. या काळात सदानंदजी यांनी पं. बाळासाहेब वाईकर यांच्याकडे चौदा वर्ष गायन-वादनाची तालिम घेतली. तसेच तालतपस्वी पं. भाई गायतोंडे यांच्याकडे तबल्याचे शिक्षण घेतले. दोन दिग्गज कलावंतांच्या तालमीत तयार झालेल्या सदानंदजींनी 1991 मध्ये ‘स्वरगंधा’ या संगीत क्लासचे रुपांतर संस्थेमध्ये केले. धर्मादाय आयुक्ताकडे रितसर नोंदणी केली आणि या संस्थेतर्फे शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम धडाक्यात सुरू केले. आजमितीला त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले असून आजही त्यांचे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. ‘स्वरगंधा’ या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आशा खाडीलकर, देवकी पंडित, भवानी शंकर, योगेश सामसी, अरविंद मुळगावकर, तौफिक भाई, साधना सरगम, आरती अंकलीकर आदी कलावंतांना आमंत्रित केले असून ‘स्वरगंधा कलाभूषण’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे. वर्धापन दिन सोहळा आणि कलावंतांना आमंत्रित करण्याचे सारे श्रेय ते आपले मित्र उदय देशपांडे यांना देतात. आयुष्यभर संगीत कलेला वाहून घेतलेल्या सदानंदजींनी विद्यार्थी कलावंतांना घडविण्यासोबत महाराष्ट्रातील अनेक शहरात मैफलींमधून कलेचे सादरीकरण केलेले असून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली आहे. या उपक्रमात सदानंदजींना मधुकर रहाटे, अरूण मोहिते, सतिश कदम, एस. एच. खोले, दशरथ सुतार, रोहिदास पवार, प्रिया चांदुरकर, शकुंतला चव्हाण, हेमराज तुडजी यांचे सहकार्य लाभले. गुरू पं. भाई गायतोंडे, पं. बाळासाहेब वाईकर, उदय देशपांडे व या मित्र मंडळींच्या मदतीमुळेच अडीच दशकांपासून सुरू असलेली त्यांची सांगितीक वाटचाल सुकर झाली आहे. या वाटचालीमध्ये त्यांना कांदिवली येथील जागतिक श्रमिक संघटनेतर्फे 2009 साली ‘समाज भूषण’ तर सुनील चौगुले स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने 2011 साली ‘ऐरोली भूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. एका पायाने अपंग असून त्याचे दुःख न बाळगता जिद्दीने, कष्टाने शास्त्रीय संगीताचा प्रसार, प्रचार करण्याचे काम करणारा हा कलावंत निश्‍चितच आदर्शवत आहे.

कलासंवाद – विजय न्यायाधीश
9822839756