अपंगत्व प्रमाणपत्राबाबत माहिती मिळेना

0

बोदवड । जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागांतर्गत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षकांचे अपंग प्रमाणपत्र वैधताबाबत कारवाई करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश कोळी यांनी 10 जुलै रोजी माहिती अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी व्ही.सी.धनके यांना माहिती मागितली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली असून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

शिस्तभंगाच्या कारवाईचा दिला इशारा
बोदवड येथे गटशिक्षणाधिकारी तथा माहिती अधिकारी व्ही.सी.धनके यांना 12 जून रोजी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे अपंग शिक्षकांच्या अपंग प्रमाणपत्र वैधता पडताळणी प्रमाणपत्राबाबत सुचीत केले आहे. संबंधित शिक्षक, शिक्षिकांची पडताळणी शासकीय वैद्यकीय रुग्णालय धुळे यांचे समितीकडून करण्याबाबत सुचीत केले आहे. तसेच कर्णबधीर, अल्पदृष्टी व अदृष्य मणक्याचे विकार या प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे. कर्णबधीर अपंगत्वाचे प्रमाणपत्र अलियावर जंग राष्ट्रीय कर्णबधीर संस्था मुंबई यांच्याकडून पडताळणी केलेले असावे तर अल्पदृष्टी व अदृष्य मणक्याचे विकार यांचे प्रमाणपत्र जे.जे.हॉस्पिटल मुंबई याठिकाणी पडताळणी केलेले असावे, असे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहे. हे पत्र संबंधित समिती किंवा रुग्णालयाकडून वैधता न केले असल्यास अथवा प्रमाणपत्रात तफावत असल्यास संबंधित कर्मचार्‍याविरुध्द शिस्तभंगाची व फसवणुकीची कारवाई करण्याचे परिपत्रकात म्हटले आहे.