अपंग प्रमाणपत्र प्रकरणात दोषींवर कारवाई होणार : सीईओ डॉ.पंकज आशिया

रावेर : रावेरातील ग्रामसेवकांनी खोटे अपंग प्रमाणपत्र सादर केल्याच्या प्रकरणावर माझ लक्ष आहे. या प्रकरणाची मी स्वत: लक्ष घालून चौकशी करणार आहे. कुणी चुकी केली असल्यास माफी कुणालाही मिळणार नसल्याचे जळगाव जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया म्हणाले. रावेर तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी म्हणून खोटे अपंग प्रमाणपत्र काढल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली होती परंतु या प्रकरणाला खरी दिशा तेव्हा मिळाली जेव्हा यातील काही ग्रामसेवकांनी खोटे अपंग प्रमाणपत्र प्रकरणात सेटलमेंट करून प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरु केला. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया हे गुरुवारी रावेर दौर्‍यावर येत असून त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आज रावेरात
रावेर पंचायत समितीला गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया भेट देणार आहेत. खोटे अपंग प्रमाणपत्राच्या प्रकरणाचा मुद्दा ऐरणीवर असतांना डॉ.आशिया रावेरात कोणती कारवाई करतात? याकडे लक्ष लागले आहे. डॉ.आशिया हे गुरुवारी सकाळी 11 वाजता रावेर पंचायत समितीत दाखल होतील व पंचायत समितीच्या विविध योजनांची आढावा बैठकदेखील घेणार असल्याची माहिती आहे. रावेर तालुक्यात ग्रामसेवकांनी सादर केलेल्या खोटे अपंग प्रमाणपत्राचे प्रकरण गाजत असतांना मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुवारी रावेर भेटीला येत असल्याने आता कारवाईकडे लक्ष लागले आहे.