नाशिक उपायुक्तांची भुसावळात भेट ; सेंट अलॉयसीस शाळेतील रॅम्प सुधारण्याचे आदेश
भुसावळ- रावेर लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन झपाटून कामाला लागले आहे. मतदान केंद्रांवर असलेल्या सोयी-सुविधांसह अपंग मतदारांना मतदान करण्यासाठी कुठल्याही अडचणी येवू नये यासाठीदेखील प्रशासनाकडून काळजी घेतली जात असून गुरुवारी नाशिक उपायुक्त प्रवीण पुरी यांनी भेट दिली. भुसावळ शहरातील विविध मतदान केंद्रांचा त्यांनी आढावा घेत रॅम्पची पाहणी केली. यावल रोडवरील सेंट अलॉयसीस शाळेत एका बाजूने असलेल्या रॅम्पची दुरवस्था झाल्याने तो भाग दुरुस्तीच्या त्यांनी सूचना केल्या.
मतदान केंद्राची केली पाहणी
नाशिकचे उपायुक्त प्रवीण पुरी यांनी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व तहसीलदार महेंद्र पवार यांच्यासह शहरातील विविध मतदान केंद्रांची तसेच तालुक्यातील मतदान केंद्राची पाहणी केली. मतदान केंद्रांवर येणार्या अपंग मतदार बांधवांसाठी रॅम्प आहे वा नाही याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली तसेच योग्य ते बदल करण्याच्याही सूचना केल्या. भुसावळ तालुक्यातून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एक हजार 677 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रांवर येण्यासाठी अपंग बांधवांना कुठलाही मनस्ताप होणार नाही यादृष्टीने पुरी यांनी सूचना केल्या.