एरंडोल । कासोदा गणातील पं.स.च्या अपक्ष सदस्या रेशमाबी शकील पठाण यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार चिमणराव पाटील यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. श्रीमती पठाण यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेचे ग्रामीण भागात असलेले वर्चस्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रेशमाबी शकील पठाण ह्या कासोदा गणातून अपक्ष म्हणुन निवडून आल्या होत्या. पठाण यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेने अल्पसंख्यांक समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. सद्यस्थितीत पंचायत समितीच्या 6 सदस्यांपैकी शिवसेनेच्या सदस्यांची संख्या 5 झाली असुन केवळ एक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे.
यावेळी माजी आमदार चिमणराव पाटील यांनी तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी आगामी काळात होणार्या निवडणुकीसाठी सज्ज राहावे असे आवाहन केले. यापुढील काळात शिवसेनेत प्रवेश करणार्यांची संख्या वाढलेली असेल असे सांगितले. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता शहरासह ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. शिवसेनेमध्येच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो असे सांगितले. यावेळी तालुका प्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, जि.प. माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती रजनी सोनवणे, उपसभापती विवेक पाटील, पं.स.सदस्य अनिल महाजन, श्रीमती.रोकडे, माजी सभापती दिलीप रोकडे यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.