अपघातप्रकरणी दोषींवर कारवाई

0

खडकी । विद्यार्थी वाहतूक करणार्‍या व्हॅनचालक व रिक्षाचालकाच्या बेजबाबदारपणामुळे सहा शालेय विद्यार्थ्यांना अपघात झाल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवाला अंतर्गत येत्या दोन दिवसांत दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळ प्रशासकीय अधिकारी दीपक माळी यांनी सोमवारी दिली.

बोपोडी चिखलवाडी येथील महापालिकेच्या माता रमाबाई आंबेडकर शाळा येथे दि.9 नोव्हेंबरला अपघाताची घटना घडली होती. इयत्ता 8वीतील विद्यार्थी हे सकाळी 9 वाजता शाळेच्या प्रांगणात योगा करीत असताना विद्यार्थी वाहतूक करणार्‍या व्हॅनने सहा विद्यार्थांना जोरदार धडक देऊन जखमी केले होते. या घटनेमध्ये यश जाधव याच्या डोक्यास तर आफताब शेख या विद्यार्थ्याचा डावा पायाचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली होती. तर इरफान शेख, वैभव रास्ते, प्रियश साळवे, स्वप्निल वाल्हेकर हे चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते. व्हॅनचालक मोईन शेख व रिक्षा चालक राशिद कुरेशी यांच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली होती. खडकी पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. जाधव व शेख या विद्यार्थ्यांना औंध येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

चौकशी करून अहवाल सादर
दरम्यान या गंभीर घटनेप्रकरणी शिक्षण मंडळाच्या वतीने चौकशी समिती नेमली. चौकशी समितीने शाळेची पाहणी करून संंबंंधितांची चौकशी करून अहवाल प्रशासकीय अधिकारी दीपक माळी यांना सादर केला आहे. चौकशी समितीचा अहवाल अतिरिक्त आयुक्तांना सादर केला जाणार असून ते या घटने संदर्भात दोषींवर कारवाईबाबत येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेतील असे माळी यांनी सांगितले.