अपघातांची मालिका कायम : भीषण अपघात कासोद्यातील तिघे जागीच ठार

एरंडोल-कासोदादरम्यान भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवले ः दाम्पत्यही जखमी

भुसावळ/जळगाव : जळगाव जिल्ह्यात अपघातांची मालिका कायम असून वाहनांवरील वेग मर्यादेमुळेच अपघात सातत्याने घडत आहेत. भडगाव ते एरंडोल मार्गावर भरधाव कारने दुचाकीला उडविल्याने कासोद्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री 9.30 वाजता कासोदा-भडगाव रोडवरील आबासाो.खंडेराव श्रीपत पाटील पेट्रोल पंपाजवळ घडली तर या अपघातात कारमधील चालकासह महिला जखमी झाली आहे.

भरधाव चारचाकीने उडवले
आडगावकडून कासोद्याकडे निघालेल्या तिघांच्या दुचाकी (एम.एच.19 बी.एन.7294) ला चारचाकी (एम.एच.08 सी.8440) ने जबर धडक दिल्याने अपघातात दुचाकीवरील बलदीप सुकाटा पवार (32), बबलू बच्चन भोसले (22) आणि जोशभाई उर्फ गोटू पिंटू चव्हाण (12, तिन्ही रा.भवानी नगर, कासोदा, ता.एरंडोल) हे तिघे जागीच ठार झाले. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कासोदा गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात कारमधील चालकासह महिला जखमी झाल्याचे सांगण्यात आले. अपघातप्रकरणी कासोदा पोलिस ठाण्यात जितेश सिसम पवार (35, साईबाबा मंदिराजवळ, कासोदा, ता.एरंडोल) यांच्या फिर्यादीनुसार कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भिक्षुकी करणार्‍या कुटुंबावर कोसळले संकट
अपघातात ठार झालेल्या तीनही जणांचे कुटूंब मोलमजुरी करतात शिवाय गावात जावून भिक्षुकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. अपघातात ठार झालेले तिघे आडगाव, ता.एरंडोल येथे कुटुंबासाठी भाकरी मागण्यासाठी गेले होते मात्र परतीच्या प्रवासात क्रुर काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. शुक्रवारी तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिल्ह्यात अपघात कायम : वेग मर्यादा गरजेची
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुसाट वेगांमुळे अपघातांची मालिका वाढली आहे. आधीच रस्त्यांच्या दुरवस्थेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतापाची भावना असतानाच भरधाव वाहनांच्या वेगावरही आता कुणाचे नियंत्रण नसल्याने त्याबाबतही आश्चर्य व्यक्त होताना दिसते. गेल्या दिड महिन्यांपासून एस.टी.चा संप सुरू असून जिल्ह्यात अवैध वाहतूक फोफावल्यानेही अपघात वाढले आहेत. मंगळवार, 21 रोजी जामनेरजवळ लाकूड वाहतूक करणार्‍या 407 वाहनाने अ‍ॅपे रीक्षाला धडक दिल्याने तीन प्रवासी जागीच ठार झाल्याची घटना घडली तर पुन्हा तीन दिवसाने अर्थात गुरूवारी लग्नाला जाणार्‍या भुसावळातील वर्‍हाडींच्या वाहनाला अपघात होवून नवरदेवाच्या मोठ्या भावासह चुलत बहिणीचा व ब्युटी पार्लर चालक विवाहितेचा मृत्यू झाला. दरम्यान, बेफाम वेगाने चालणार्‍या चारचाकी वाहनांसह डंपर, ट्रकवर अंकुश लावण्यासाठी वेग मर्यादचे नियम आणखीन कडक करून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जवाबदारी आता आरटीओ व पोलिस प्रशासनाची असल्याचा सूर सुज्ञ जनतेतून व्यक्त होत आहे.