मुंबई – शहरात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर टॅक्सीचालक जखमी झाला. मृत तरुणाचे नाव साहिल मिश्रा असून जखमी टॅक्सीचालक नाव सय्यद शफुर गफुर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शीव आणि ओशिवरा पोलिसांनी दोन अपघाताची नोंद केली आहे. अपघातानंतर दोन्ही चालक पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
सुरजीत सरजुप्रसाद मिश्रा हे जोगेश्वरी येथील आर. आर. ठाकूर मार्गावरील मजास रोडवरील शिवकुंज इमारतीमध्ये राहत असून त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. साहिल हा त्यांचा पुतण्या असून काल दुपारी तीन वाजता तो त्याच्या मोटारसायकलवरुन घरी येत होता. बाळासाहेब ठाकरे उड्डानपुल, पूर्वे वाहिनी, जोगेश्वरी येथे एका अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अपघाताची नोंद करुन पळून गेलेल्या चालकाचा शोध सुरु केला आहे. दुसरा अपघात अपघात शुक्रवारी दुपारी दोन वाजता डॉ. बी. ए. ररोडवरील इस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ झाला. सय्यद हा टॅक्सीचालक असून तो सध्या मुंब्रा येथे राहतो. शुक्रवारी तो इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन जात होता. यावेळी भरवेगात जाणार्या एका टेम्पोने त्याच्या टॅक्सीला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सय्यदला जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. अपघातात टॅक्सीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध पोलिसांनी विविध भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला असून अपघातानंतर तो पळून गेला होता.