गुजरात पेट्रोलपंपाजवळ कंटनेरचे पायावरुन गेले होते चाक ;कंटनेरचालकाविरोधात गुन्हा
जळगाव : घरी जात असताना खोल साईडपट्टीवरून दुचाकी घसरल्याने खाली पडल्यानंतर पायावरुन कंटेनरचे चाक गेल्याने सेवानिवृत्त नायब तहसिलदार अरूण महादू बागुल (60) रा. अहिल्याबाई नगर खोटेनगर हे गंभीररित्या जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी महामार्गावरील गुजराल पेट्रोलपंपाजवळ घडली होती. खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बागुल यांची गुरूवारी पहाटे प्राणज्योत मालवली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून कंटनेरचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
अरूण बागुल हे खोटेनगर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी ते त्यांच्या मालकीची दुचाकी क्रमांक एम.एच. 19 के 6227 ने जाण्यासाठी निघाले. पंपाजवळ साईडपट्टीवरून हायवेवर जात असताना दुचाकी घसरून अरूण बागुल हे दुचाकीवरून खाली पडले. त्याचवेळी त्यांच्या मागवून पार्सलचा कंटेनर क्रमांक जी.जे.27 व्ही.0054 भरधाव वेगाने येऊन बागुल यांच्या दोघा पायावरून चाक गेल्याने ते रक्ताच्या थारोळयात पडले. पिंप्राळयाचा आठवडे बाजार भरला असल्याने परिसरात गर्दी होती. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस तत्काळ वाहनातून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.
कंटेनरचालक पोलिसांच्या ताब्यात
प्राथमिक उपचाराअंती जखमी बागुल यांना खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी मयताचे जावई सचिन सुधाकर पाटील (प्रभात कॉलनी परिसर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामादंनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कंटेनरचालक तसवीरसिंग निरजंनसिंग रा. अमृतसर (पंजाब) याला ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.