जळगाव । जळगावातील वाघनगर येथे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या वृध्दाला स्मशानभुमी बाहेरील रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत वृध्दाच्या डोक्याला जबर दुखापत होवून जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी 11.40 वाजेच्या सुमारास घडली. वाघनगरातील सरलाबाई मराठे यांचे दि.23 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते. आज सकाळी शिरसोली येथील दशरथ दगडु सोनने मुळ रा. दापोरा वय 74 हे त्यांच्या पत्नीसह अंत्यविधीसाठी वाघनगर येथे आले होते. त्यानंतर अंत्यविधीसाठी नातेवाईकमंडळी नेरीनाक्याजवळील स्मशानभुमीजवळ आले. यावेळी दशरथ सोनुने देखील त्यांच्या मोटारसायकलीने अंत्यविधीसाठी स्मशानभुमीच्या ठिकाणी आले.
जिल्हा रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश
अंत्यविधीला वेळ असल्याने ते काही कामासाठी नातेवाईकांसोबत बाहेर आले होते. याचवेळी रस्ता ओलांडतांना भरधाव वेगात आलेल्या अज्ञात मोटारसायकलीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होवून रक्तस्त्राव झाला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिक व नातेवाईकांच्या मदतीने त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉ. पाटील यांनी त्यांना मयत घोषित केले. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी अंत्यविधी आटोपून लागलीच जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी दशरथ सोनुने यांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला. दरम्यान त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, सुना असा परिवार असून या घटनेबाबत शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.