अपघातातील मृतदेह दीडतास रस्त्यावरच

0

पिंपरी-चिंचवड : मोटारसायकलवर पडलेले पोते उचलण्यासाठी उतरलेल्या वृद्धाचा ट्रक धडकेत मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेअकराच्या ही घटना घडली. मात्र दुपारी एकपर्यंत पोलिसांच्या हद्दीच्या वादामुळे आणि रुग्णवाहिका न आल्याने मृतदेह तसाच रस्त्यावर पडून राहिला. मुरलीधर हरीश्‍चंद्र कांबळे (वय 60, रा. पिंपळे गुरव) असे वृद्धाचे नाव असून ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला.

गाडीवरून पोते पडले आणि…
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, कांबळे आपल्या मुलासबोत लांडेवाडी येथील दुकानातून तांदळाचे पोते घेऊन मोटारसायकलवरून घरी निघाले होते. मात्र टी जंक्शनजवळ त्यांच्या मांडीवरील पोते खाली पडले. हे समजताच मुलाने मोटारसायकल पुढे थांबवली. नंतर कांबळे पोते घेण्यासाठी खाली उतरले. यावेळी समोरुन एक येणारा ट्रक त्यांना दिसलाच नाही आणि डोक्यावरून चाक गेले.

खासगी रुग्णवाहिका बोलावली
घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. मात्र एकपर्यंत पोलीस आणि रुग्णवाहिका न येवू शकल्याने मृतदेह रस्त्यावरच पडून होता. अखेर नागरीकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन याची माहिती दिली. नियंत्रण कक्षातून फोन गेल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी एक तासानंतर घटनास्थळी आले. शेवटी खासगी रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आला. या घडलेल्या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.