ठाणे । अपघातात कायमचे अपंगत्व आलेले भिवंडीचे सिव्हिल इंजिनीअर किरण उर्फ केररॉन एच पाटील (38) यांना नुकसानभरपाईपोटी 1 कोटी 4 लाख 55 हजार 263 रुपयांची भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य के. डी. वडाने यांनी दिले आहेत. उत्तरप्रदेशमधील रोशन करिअर या कंटेनरचा मालक आणि विमा कंपनी न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड यांना संयुक्तरीत्या ही नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. याशिवाय नुकसानभरपाईच्या रकमेवर 2015 पासून निकालाच्या तारखेपर्यंत अर्जदाराला 8 टक्के व्याजही देण्याचा निकाल प्राधिकरणाने दिला आहे. भिवंडीतील कानेरीमध्ये राहणारे किरण उर्फ केररॉन एच पाटील हे सिविल इंजिनिअर आहेत. पाटील हे दोस्ती कोर्पोरेशन कंपनीमध्ये काम करायचे. 2 सप्टेंबर 2015 रोजी भिवंडीला घरी येताना पाटील यांचा भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशातून आलेल्या रोशन करिअर या कंटेनरने पाटील यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात त्यांचे दोन्ही पाय आणि कंबर निकामी झाली.
अपघातानंतर त्यांच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी 40 लाखांचा खर्च आला होता. मोटार अपघात प्राधिकरणाकडे पाटील यांनी दावा दाखल केल्यानंतर प्राधिकरणाने दावेदार पाटील यांना प्रत्यक्षात बोलावले असता त्यांना रुग्णवाहिका आणि स्टेचरच्या साहाय्याने आणण्यात आले. पाटील हे परावलंबी झाले असून प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता असल्याचे प्रत्यक्ष प्राधिकरणाने पाहिले. या अपघातामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनातही अपयश आले. दरम्यान, प्राधिकरणाने अपंगत्व आलेल्या पाटील यांच्यावर उपचार करणार्या डॉ. अजय कंबूर यांचीदेखील साक्ष नोंदविली. त्यांनी पाटील यांच्या वास्तव स्थितीची कल्पना प्राधिकरणाला दिली. या अपघातामुळे आलेले अपंगत्व लक्षात घेता नुकसानभरपाईसाठी दावेदार पाटील यांनी 1 कोटी 55 लाख 7 हजार 327 रुपयांचा दावा प्राधिकरणाकडे दाखल केला होता.
निकालाच्या तारखेपर्यंतचे व्याज देण्याचे आदेश
मोटार अपघात प्राधिकरणाचे सदस्य के. डी. वडाने यांनी या प्रकरणात तपास करुन अर्जदार किरण पाटील यांना रोशन करिअरचा कंटेनर मालक आणि विमा कंपनी न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड यांना संयुक्तरीत्या 100 टक्के अपंगत्व आलेले इंजिनीअर पाटील यांना 1 कोटी 4 लाख 55 हजार 263 रुपयांची भरपाई देण्याचा निकाल दिला. या भरपाईत 25 लाख 10 हजार 312 रुपये ओपीडी, आयपीडी, मशीनचा खर्च आणि भविष्यातील नुकसान म्हणून 73 लाख 50 हजार देण्याचे निकालात नमूद करण्यात आले आहे. सोबतच या रकमेवर 2015 पासून निकालाच्या तारखेपर्यंत अर्जदाराला 8 टक्के व्याजही देण्याचा निकाल प्राधिकरणाने दिला आहे.