अपघातात चार खेळाडूंचा मृत्यू

0

दिल्ली : दिल्लीत पसरलेल्या धुक्यामुळे सिंधू बॉर्डवर भीषण अपघात झाला. या अपघतात देशाच्या चार पावरलिफ्टर खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी आहेत. जखमींमध्ये वर्ल्ड चॅम्पियन सक्षम यादवचा समावेश आहे. दिल्लीच्या अलीपूरजवळ रविवारी पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला.

पानीपतमध्ये एका क्रीडा संमेलनाहून हे एका स्विफ्ट डिझायर कारमधून परतत होते. एका वाहनाला ओव्हरटेक करताना दाट धुक्यामुळे समोरचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. दुभाजकाला धडक दिल्यानंतर कार पलटी झाल्याने आत अडकलेल्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. मृत्यू झालेल्यांपैकी तीन युवा खेळाडूंची ओळख पटली असून हरीश, टिंकू आणि सूरज अशी त्यांची नावे आहेत. तर सक्षम यादवसोबत जखमी झालेल्या बाली याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर नरेलाच्या सत्यवादी राजा हरिश्चंद्र रुग्णालयात उपचार सुरू आहेत.