जळगाव – मेहरूण परिसरातील हॉटेल कस्तुरीजवळ शनिवारी रात्री ९ वाजता एका मद्यपी मालवाहू रिक्षाचालकाने मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवून समोर प्रवासी रिक्षासह एका दुचाकीस धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले. यातील सुरेश शंकर कापुरे (वय ६२, रा. कोळीपेठ) यांचा सोमवारी दुपारी १२.३० वाजता मृत्यू झाला. तर मद्यपी रिक्षाचालक रविवारी रात्रीच रुग्णालयातून पळून गेला. मद्यधुंद मालवाहू रिक्षाचालकाने बेदारकपणे रिक्षा चालवून लोकांना धडक दिली. कापुरे हे पायी चालत असताना त्यांना पाठीमागून उडवले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूला मार लागल्यामुळे रविवारी रात्रीच त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. कापुरे हे वयोवृद्ध होते. एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये ते सुरक्षारक्षकाची नोकरी करायचे. रविवारी ड्यूटी संपल्यानंतर पायी घरी जात असताना त्यांना मालवाहू रिक्षाने धडक दिली. त्यांच्या पश्चात आई विमलबाई, पत्नी लीलाबाई व मुलगा उदय असा परिवार आहे. दोन गंभीर आजारातून बरे झाल्यानंतर कापुरे पुन्हा सुरक्षारक्षकाच्या नोकरीस लागले होते. आजारांशी दोन हात करणाऱ्या कापुरे यांचा मद्यधुंद रिक्षाचालकाने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान मृत्यू झाला.