अपघातात जखमी संगीतकार बालाभास्कर यांचे निधन

0

नवी दिल्ली- संगीतकार आणि व्हायोलिनवादक बालाभास्कर यांचे आज वयाच्या केवळ ४० व्या वर्षी निधन झाले. आठवडाभरापूर्वी बालाभास्कर यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात बालाभास्कर यांच्या दोन वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाला होता.

बालाभास्कर हे २५ सप्टेंबर रोजी त्यांच्या कुटुंबासोबत थ्रिसूर येथे एका कार्यक्रमात गेले होते. त्यांच्यासोबत कारमध्ये चालक, पत्नी व दोन वर्षांची मुलगी देखील होती. पल्लिपुरम येथे बालाभास्कर यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळली. या भीषण अपघातात त्यांच्या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर बालाभास्कर आणि त्यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. बालाभास्कर यांच्या मेंदूला इजा झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. मंगळवारी सकाळी बालाभास्कर यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

बालाभास्कर हे दक्षिणेतील प्रख्यात व्हायोलिनवादक असून त्यांनी हरिहरन, सुरेश वाडकर, के. एस. चित्रा यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केले होते. बालाभास्कर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. बालाभास्कर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तिरुअनंतपूरम येथील महाविद्यालयात ठेवले जाणार आहे. याच महाविद्यालयात बालाभास्कर यांनी शिक्षण घेतले होते. त्यांची पत्नी लक्ष्मी व कारचा चालक अर्जून या दोघांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.