अपघातात जखमी होवून पडलेल्या दोघांना मागून येणार्‍या टेम्पोने चिरडले

0

चर्‍होली फाट्यावरील घटना : मृत चर्‍होली व नांदेडचे

पिंपरी-चिंचवड : समोरासमोर दुचाकींची धडक होवून रस्त्यावर दोन्ही चालक पडले आणि मागून वेगात असणार्‍या टेम्पोखाली चिरडले गेले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. किरण सुरेश सावंत (वय 24, रा. शुभारंभ सोसायटी, काळे कॉलनी, चोवीसावाडी, च-होली बुद्रुक, ता. हवेली पुणे) आणि कैलास रावसाहेब काळे (वय 38, रा. धावरी, जि. नांदेड) अशी त्यांची नावे आहेत. पुणे-आळंदी रस्त्यावरील चर्‍होली फाट्यावर सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला..

उपचारापूर्वीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी किरण सावंत चोवीसावाडीकडून चर्‍होली कडे जात होता. याचवेळी कैलास काळे आळंदी कडून चर्‍होली कडे येत होता. या दोन्ही दुचाकींची चर्‍होली फाटा येथे जोरदार धडक झाली. यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. याचवेळी आळंदीकडून भरधाव वेगात आलेल्या टेम्पाखाली ते सापडले. रस्ता गजबजलेला असल्याने तात्काळ लोकांची गर्दी जमली. दिघी पोलिसांनी त्यांना रुग्णालायत दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.