कल्याण : गुजरातमधील बरवाला येथे भीषण अपघातात डोंबिवलीतील एकाच भाविक कुटुंबातील 11 जणांवर काळाने घाला घातला. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. हे सर्व भाविक गुजरातला देवदर्शनासाठी जात असताना सिलेंडरने भरलेला ट्रक व जीपची आमनेसामने धडक बसून ड्रायव्हरसह 11 जणांचा जागीच मृत्यु झाला असून या अपघातातून एक लहान मुलगा बचावला आहे.
अपघातात तिन्ही भावांचा परिवार समाप्त
या अपघातात नीलकंठ पूजा, चार रस्ता येथे राहणारे शशिकांत शहा (56), त्यांची पत्नी रिटा शहा (46), मुलगी धरा शहा (25) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा जैनम शहा डोक्याला लागल्याने गंभीर जखमी असून त्याला सुरतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शशिकांत शहा यांचे लहान भाऊ कमलेश शहा हे निशिगंध सोसायटी मध्ये राहतात. कमलेश यांचे 7 वर्षांपूर्वी हृदय विकाराने निधन झाले होते. या अपघातात त्यांची पत्नी किरण शहा, मुलगी जिनाली शहा, मुलगा नेविल शहा यांचा मृत्यू झाला.
राजाजी पथ येथील वीणा बिल्डिंग (मद्रासी बिल्डिंग) मध्ये राहणारे हितेश शहा (52) पत्नी विभा शहा (48) भाचा नंदीप शहा (22) यांचा मृत्यू झाला. सुरतमध्ये राहणार्या भारती शहा (54) यांचा मृत्यू झाला. या अपघातात जयश्री शहा यांचाही मृत्यू झाल्याची बातमी सुरुवातीला आली होती. पण, त्या जिवंत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर ट्रॅक्सचा चालक महंमद रसूल मलिक (50, रा. बडोदा) या अपघातात मरण पावला आहे.
पालिताना मंदिराला जाताना घडला अपघात
डोंबिवली पूर्वेतील रघुवीरनगरमध्ये निळकंठ पूजा इमारतीत राहणारे शशिकांत शहा, पत्नी – सोनल उर्फ रिटा, मुलगी – धरा आणि मुलगी – जैनम, टाटा लाईनला कस्तुरी प्लाझा जवळच्या निशीगंध सोसायटीत राहणारे किरण शहा, मुलगी जिनाली व मुलगा नेमील, तसेच राजाजी पथावर वीणा बिल्डिंग (मद्रासी बिल्डिंग) मध्ये राहणारे हितेश शहा, पत्नी – विभा, भाचा – नंदीप हे वेगवेगळ्या ठिकाणी राहणार्या कुटुंबाने गुजरात राज्यातील भावनगर येथे असलेल्या पलिताना मंदिराकडे देव दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन केला होता. जैन समाज्याच्या पर्युषण काळ शनिवारी समाप्त झाल्यामुळे शहा कुटुंबिय रेल्वेने गुजरातमधील भावनगर येथे पलिताना मंदिराकडे देव दर्शनासाठी निघाले. यात्रेला निघालेले हे कुटुंबीय शनिवारी खूपच आनंदात होते. बडोदा येथे राहणार्या शशिकांत शहा यांची मोठी बहीण जैशुबेन, तसेच भारतीबेन या दोघींना सोबत घेतले. तूफान ट्रॅक्स जीपने हे कुटुंब अहमदाबाद महामार्गावर असलेल्या धंधुका-बरवाला येथून भावनगरकडे निघाले. याच रस्त्यावर पहाटेच्या सुमारास जीप आणि इंडेन कंपनीच्या गॅस सिलेंडर्सने भरलेल्या ट्रकची धडक झाली. या भीषण अपघातात ड्रायव्हर महंमद मलिकसह शहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला.
डोंबिवलीवर शोककळा
अपघाताचे वृत्त डोंबिवलीत येऊन धडकताच निळकंठ पूजा, निशीगंध सोसायटी आणि वीणा बिल्डिंग (मद्रासी बिल्डिंग) या तिन्ही इमारतींकडे विचारपूस करणार्यांची रिघ लागली होती. अपघाताची माहिती मिळताच डोंबिवली येथील घरी थांबलेल्या हितेन यांच्या 80 वर्षाच्या आईची शुद्ध हरपली. तिच्यासह नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जैन समाजाचा पर्युषण काळ समाप्तीनंतर रविवारी डोंबिवलीत रथयात्रा निघाल्या होत्या. डोंबिवलीत जवळपास 6 ते 7 जैन मंदिरे आहेत. अपघाताचे वृत्त सर्वत्र पसरताच जैन समाजावर शोककळा पसरली आहे. संध्याकाळी गोडधोड मिठाई जेवणाचा बेत या रद्द करण्यात आला. हे सर्व जेवण गरिबांना वाटप करण्यात आल्याचे पंकज शहा यांनी सांगितले. या प्रभागाचे नगरसेवक तथा केडीएमसीचे सभागृह नेता राजेश मोरे यांनी शहा कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन केले