धुळे । काल सायंकाळी येवल्याजवळ एस.टी.बस,क्रुझर, मारुती व्हॅन आणि पल्सर मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात धुळ्यातील दोन बालकांसह आठ जण ठार झाले असून 18 जण जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी या अपघाताचे वृत्त धुळ्यात येऊन धडकताच फाशीपूल परिसरात शोककळा पसरली. रक्तात दोस्ताना ग्रुप आणि आई मित्रमंडळाच्या गणेशमुर्ती तात्काळ झाकण्यात आल्या. तर मृत व जखमींच्या नातलगांनी येवल्याकडे धाव घेतली. हे सर्व जण साखरपुड्यासाठी गेले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फाशीपुलावरील विजय गांगुर्डे या तरुणाचा साखरपुडा काल कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे असल्याने धुळ्यासह मध्यप्रदेश व गुजरातमधील नातलग गेले होते.
चार वाहनांना अपघात
साखरपुडा आटोपून परत येतांना हे सर्व जण क्रुझर गाडीने मनमाडकडे परत येत होते. गाडीत जागा नसल्याने नवरदेव विजय गांगुर्डे हा मित्रासोबत मोटरसायकलने निघाला होता. बाभुळगाव शिवारात जिपला ओव्हरटेक करण्याच्या नादात क्रुझरने मोटरसायकलला धडक दिली. त्यात नवरदेव विजय व त्याचा मित्र जखमी झाला. तर क्रुझर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती समोरुन येणार्या या ओमनी व्हॅनवर आदळली. शिवाय या दोन्ही गाड्या धुळे-पुणे या बसवरही जावून आदळल्या. अपघातात आदित्य मरसाळे, यश महेश राव, या दोघा बालकांसह महेश दिलीप राव, संजय सोनवणे , निशांत तिवारी इटावा, आशुतोष तिवारी यांची पत्नी रितू तिवारी, दिक्षित हे मरण पावले. तर भारती राव, स्वप्निल बाविस्कर, योगेश मरसाळे, भुषण गांगुर्डे, लताबाई गांगुर्डे, यश गांगुर्डे, मोहित गांगुर्डे, ज्योती गांगुर्डे, आदित्य मरसाळे, विजय गांगुर्डे सर्व धुळे यांच्यासह पियुष तिवारी, दिपा तिवारी, शिनु तिवारी सर्व रा.इटावा,मध्यप्रदेश, इंदुबाई चित्ते, लोटन चित्ते दोघे रा.धरणगाव, पवन जाधव दोंडाईचा, पिंटू राव, भारती महेश राव दोघे रा.सुरत, गुड्डी मरसाळे जळगाव हे जखमी झाले.