जिल्हा न्यायालयाचा निकाल
जळगाव:जळगाव ते पारोळा दरम्यान महार्गावर झालेल्या अपघातात 8 ऑगस्ट 2018 रोजी ओमनी चालक राकेश राजेंद्र वराडे वय 23 याचा मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी एस.टी.महामंडळाच्या चालकाविरोधात जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला होता. या खटल्यात मयत ओमनी चालक हा स्वतः त्याच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे सांगत हा खटला न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायालयाचे प्रमुख व सत्र न्या. गोविंद सानप यांनी हा निकाल दिला.
महामार्गावर ओव्हरटेकच्या नादात अपघात
माळीमाडा येथील रहिवासी राकेश राजेंद्र वराडे याची ओमनी आहे. जळगाव ते पारोळा तो प्रवासी वाहतूक करुन उदरनिर्वाह भागवित होता. 8 ऑगस्ट 2016 रोजी तो त्याची ओमनी (एम.एच.19 बी.जे.5457) ने जळगावहून पारोळ्याकडे जात होता. यादरम्यान पारोळ्याजवळ समोरुन येणार्या बसने (एम.एच.14 बी.टी. 2042) ओमनीला धडक दिल्याने अपघातात ओमनी चालक राकेश वराडे याचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी बसचालक शिवाजी बेनीराम बोरसे रा. देवपूर धुळे याच्या फिर्यादीवरुन पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. समोरील ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात ओमनीवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात होवून त्यात चालक राकेश याचा मृत्यू झाल्याचे नमूद होते.
मयत स्वतः अपघातास जबाबदार
मयत राकेश याचे वडील, राजेंद्र बाबुराव वराडे व आई शोभाबाई यांनी एस.टी.चालक शिवाजी बेनीराम याच्याविरोधात जिल्हा न्यायालयात दहा लाखांच्या नुकसान भरपाईचा खटला दाखल केला होता. न्या. गोविंद सानप यांच्या न्यायालयात हा खटला चालला. खटल्यात एस.टी.चालक तसेच अर्जदार मयत राकेशचे वडील राजेंद्र वराडे यांची साक्ष नोंदविण्यात आली. एस.टी.महामंडळातर्फे अॅड. विजय काबरा यांनी प्रभावी युक्तीवाद केला. साक्षीदार व युक्तीवादाअंती न्या. सानप यांनी मयत राकेश हा यांच्या चुकीमुळे हा अपघातस झाला असून नुकसान भरपाई मिळणार नाही असा निकाल देत, हा दावा फेटाळून लावला.