ठाणे । अपघातात मृत्यू झालेल्या हॉटेल व्यवस्थापकाच्या कुटुंबीयांना 12 लाख 79 हजारांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायधीश के. डी. वदने यांनी दिले. मृत हॉटेल व्यवस्थापक समद तुराणी यांच्या कुटुंबाला ही मदत दावा दाखल झाल्यापासून 8 टक्के व्याज दराने ट्रक मालक व रिलायन्स इन्शुरन्स कंपनी यांनी संयुक्तरित्या द्यावी असे निर्देश दिले. समद तुराणी (23) हा मुंब्रा येथील हॉटेल साहिल येथे व्यवस्थापक म्हणून काम करत होता. 29 नोव्हेंबर 2014 ला समद हा मोटरसायकल वरून मुंब्रा ते पनवेल प्रवास करत होता. शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागून आलेल्या भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. यात समद तुराणी हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी प्रथम मुंब्र्याच्या काळसेकर रुग्णालयात नेले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले. तेथून समदला मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण अखेर त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी समद तुराणी याच्या कुटुंबीयांनी मोटार अपघात प्राधिकरणाकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केला. मृत समद यांच्या पश्चात विधवा पत्नी शबनम, वडील अन्वर हुसेन अब्दुल कय्युम तुराणी (49) आणि आई बिलक्स (42) असून ते मुंब्रा कौसा येथे राहतात. मोटार प्राधिकरणाने घटनास्थळाचा पंचनामा, पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर दाखल गुन्हा आणि अपघाताची माहिती या आधारे जिल्हा न्यायधीश वदने यांनी हा निर्णय दिला. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातप्रकरणी प्राधिकरणासमोर ट्रक चालक अझिझुल्ला हसमुल्ला शेख आणि इन्शुरन्स कंपनीच्या वतीने वकील के. व्ही. पुजारी यांनी उपस्थिती दाखवली. जिल्हा न्यायधीश के. डी. वदने यांनी नुकसान भरपाई पोटी 12 लाख 79 हजार रूपये देण्याचा निर्णय दिला. सादर रक्कम मृताच्या परिवाराला दावा दाखल झाल्यापासून 8 टक्के व्याजाने देण्याचा निर्णय देण्यात आला.