अमळनेर । अमळनेर धुळे रोडवरील लोंढवे फाट्याजवळ लक्झरी व मोटरसायकल अपघातात नवलनगर येथील महाविद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक संजय ठाकरे (मुळचे सातरणे)हे जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. धुळ्याहून अमळनेर कडे येणार्या भरधाव लक्झरी क्र.एम.एच.19.वाय.6292 ने अमळनेर हुन नवलनगर येथे जात असलेले संजय युवराज ठाकरे यांच्या ऍक्टिवा क्र.एम.एच.18.ए.क्यू.8869 ला जोरदार धडक दिली.
धडक एवढी जोरदार होती की ऍक्टिवा गाडी चक्काचूर झाली. ह्यावेळी नातलगांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी गर्दी जमा झाली होती. संतप्त नातलगांनी ट्रव्हल्सची तोडफोड केली. जोपर्यंत फरार चालकास अटक होत नाही तोपर्यंत शव ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने रस्त्यावर दोन्ही कडे वाहतूक खोळंबली होती. अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी जावून परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली असून ट्रव्हल्स चालक जागेवरून फरार आहे.