अपघाती मृत्यूनंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

0

पुरंदर । नीरा या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे पडल्याने अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या महामार्गाची दुरुस्ती करावी, तसेच आतापर्यंत अपघाताला आणि रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार धरून संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पुरंदर तालुका काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यावेळी उपस्थित होते.

खासदार सुळे नुकत्याच पुरंदरच्या दौर्‍यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांना सासवड येथे हे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, दत्ता झुरंगे, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, नगरसेवक सुहास लांडगे, प्रवीण भोंडे, गणेश जगताप तसेच यशवंत जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हडपसर ते नीरा दरम्यानच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज अनेक अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांना आपला प्राण गमवावा लागला असून संबंधित विभागाला अनेकदा निवेदन देऊनही त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आता या अपघातांना जाबाबदार असलेल्या विभागातील अधिकारी, ठेकेदार आणि तालुक्याच्या लोकप्रतिनिधींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्याचे काँग्रेसच्या पदाधिकर्‍यांनी सांगितले.