अपघात, आगीचे 9 बळी; धुळ्यावर शोककळा

0

धुळे। मध्यरात्री घराला अचानक आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास शहरातील अकबर चौकातील धना डाळ बोळीत घडली. जवळपास एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. तोपर्यंत घरात अडकून पडलेल्या पाचही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. वर्दळीच्या पाचकंदील परिसरात शनिवारी मध्यरात्रीनंतर पावणेदोनला राम शर्मा यांच्या धनाडाळ बोळीतील घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या दुमजली व बहुतांशी लाकडाच्या घराच्या पहिल्या मजल्याला आग लागली. मात्र दुसर्‍या मजल्यावर झोपेत असलेल्या शर्मा कु टुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शोभाबाई शर्मा (62), राम शर्मा (45), जयश्री राम शर्मा (35), साई राम शर्मा (12) आणि राधे राम शर्मा (10) यांचा समावेश आहे. शोभाबाई शर्मा यांना अत्यवस्थावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करुनही उपचारांना यश आले नाही.

दहा बाय पंधराच्या दोन खोल्यांमध्ये वास्तव्य
राम शर्मा यांच्या साधारण: 10 बाय 15 फुटांच्या दोन खोल्या होत्या. या दुमजली घराला ये-जा करण्यासाठी एकच दरवाजा होता. त्यांनी ‘वाचवा वाचवा’ अशी आरडाओरड केली, पण आगीचे रौेद्ररूप पाहता मदतीला कोणी जाऊ शकले नाही. काही वेळानंतर बचावासाठी येणारा आवाज बंद झाल्याने परिसरातील नागरिक सुन्न झाले.

आगीवर तासाभरानंतर नियंत्रण
अकबर चौकात घराला आग लागल्याची बातमी मनपाच्या अग्निशामक दलाला कळविण्यात आल्यावर काही वेळातच अग्निशामक दलाची गाडी याठिकाणी दाखल झाली मात्र आग एवढी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तासाभराचा अवधी उलटला. आग विझविण्यात अग्निशमन पथकाला यश आले . आग लवकर न विझल्यामुळेे घरात अडकलल्या शर्मा परिवाराला वाचवता आले नाही.

राम शर्मा मारूती मंदिराचे पुजारी
राम शर्मा हे पाचकंदिल परिसरातील उसगल्लीमधील दक्षिणमुखी मारुती मंदिराचे पुजारी होते. रविवारी शनि प्रदोष असल्याने शनिवारी रात्री त्यांनी मंदिराची सजावट केली होती. या घटनेनंतर परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला े. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण धुळे शहरावर शोककळा पसरली आहे.

आग लागण्याच्या घटनेचा आम्हाला मध्यरात्री फोन आला तसा आम्ही अग्निशामकदलाची गाडी पाठवली. मात्र शर्मा कुंटूंबीयांना वाचवता आले नाही. शार्टसर्कीटने आग लागली आणि लाकडाचे घर असल्यामुळे आगीने रोद्ररूप धारण केले. या दुर्देवी घटनेने संपूर्ण शहर हादरले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांनी जपून राहावे. कुणाच्याही घरात असे घडु नये यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी.
– कल्पना महाले, महापौर

धुळ्यात दोन दुर्देवी घटना घडल्या. आगीत कुटूंब उद्धस्त झाले. अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. शार्टसक्रीटने घराला आग लागल्यामुळे ही दुर्देवी घटना घडली. नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रानिक वस्तूंची तपासणी करून घेतली पाहीजे. महामार्गाचे धिमे गतीने होणारे काम अपघाताला कारण आहे. वेळोवेळी घडणार्‍या अपघातांची कल्पना आम्ही केंद्र सरकारकडे पोहचवत असतो. कारण महामार्गाचे काम हे केंद्र सरकारच्या अक्त्यारीतले आहे. कामाचा वेग वाढवावा तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे यासाठी आम्ही नेहमी पाठपुरावा करत असतो.
– अनिल गोटे, आमदार