ठाणे । सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवरील जास्तीत जास्त अपघात होणार्या ब्लॅक स्पॉट्सची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, महानगरपालिका तसेच पोलीस वाहतूक शाखेमार्फत अशा ठिकाणांची यादी प्रादेशिक परिवहन विभागाकडे देण्याच्या सुचना आहेत. रस्ते अपघातात दरवर्षी 10 टक्के घट करण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी या सर्व संस्थांनी 8 सप्टेंबरपर्यंत अशी यादी सादर करण्यास सांगितले. जेणे करून प्रादेशिक परिवहन विभागाला पुढील कार्यवाही करणे सोयीचे जाईल. अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी देखील याबाबतीत सुचना दिल्या. प्रारंभी या रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे या समितीत आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकार्यास विशेष निमंत्रित म्हणून घेण्यात येईल असे सांगितले तसेच ब्लॅक स्पॉट्सचे नवे निकष स्पष्ट केले.
वाहन प्रशिक्षण आता कौशल्य विकास केंद्रातून, जिल्हाधिकार्यांच्या सूचना
नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे मनपाच्या परिवहन सेवा अधिकाधिक चांगल्या झाल्या आणि त्यांच्या फेर्या वाढल्या तर अवैध वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार नाही असे यावेळी बोलताना कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी यावेळी सांगितले. कल्याण कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. दुचाकी वाहन डीलरच्या माध्यमातूनच ट्रेनिंग स्कूल सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुरु करण्यात आलेल्या गावदेवी आणि कल्याण येथील कौशल्य विकास केंद्रात वाहन चालक प्रशिक्षणही देता येते का यासाठी अभ्यासक्रम तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या. नवी मुंबईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी देखील महत्वाच्या सुचना केल्या.
झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगविणे, क्रेन, रुग्णवाहिकांची उपलब्धता, सुरक्षा ऑडीटवर चर्चा
नव्या निकषानुसार रस्त्यावरील कोणताही 500 मीटरचा असा भाग जिथे गेल्या 3 वर्षांत किमान 5 रस्ते अपघात झाले आहेत आणि त्यात किमान 10 व्यक्ती मरण पावल्या आहेत. व्यक्ती गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत अशा प्रसंगांमध्ये ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात येतो. अशा ब्लॅक स्पॉटचे कायमस्वरूपी जिओ टॅगिंग ही करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्याला मुंबई, नाशिक, पुणे, पालघर या भागाशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचप्रमाणे राज्य व जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते पण आहेत. याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक ती दुरुस्ती करणे, दुभाजक नीटनेटके करणे, झेब्रा क्रॉसिंग पट्टे रंगविणे, सावधानतेचे फलक लावणे, क्रेन, रुग्णवाहिकांची उपलब्धता, सुरक्षा ऑडीट याविषयीही या बैठकीत चर्चा झाली.
कोपरी, नवी मुंबईतील वाहतूक पार्किंग
कोपरी येथे अनधिकृतरित्या रात्रीच्या वेळी पार्क केलेल्या बसेसमुळे वाहतुकीचे गंभीर प्रश्न निर्माण होतात अशी नागरिकांची तक्रार आहे तसेच नवी मुंबई पाम बीच कडे जाणार्या मार्गावरील हॉटेल्स समोर शेकडो वाहने पार्क केलेली असतात त्यामुळे अडथळा निर्माण होतो यावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी ठाणे पोलीस वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले.
लायसन्स जमा करावे
वाहतूक नियमांचा भंग करणार्या वाहनधारकाकडून बर्याच वेळा त्याचे लायसन्स वाहतूक पोलीस ताब्यात घेतात. त्याची केवळ नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे होते मात्र प्रत्यक्षात ते लायसन्स आमच्याकडे जमा केले जात नाही. वाहनधारकाकडून दंड वसुली नंतर वाहतूक पोलीस त्याला ते परत करतात त्यामुळे परवाना निलंबनाची कारवाई करता येत नाही यावरही या बैठकीत चर्चा झाली. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती, तसेच सिनेमागृहांतून चित्रफिती प्रदर्शित करण्यात येतील अशी माहितीही यावेळी देण्यात आली.