विवरेनजीक अपघात : दोन प्रवासी किरकोळ जखमी
रावेर- भरधाव ट्रकचा अपघात रोखण्याच्या नादात रावेर-बारामती बस विवरेनजीक उलटल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी टळली असून दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. रावेर आगारातून (एम.एच 40 वाय.5192) ही रावेर-बारामती बस 20 प्रवासी घेऊन निघाली असताना विवरेगावानजीक बससमोर ट्रक आल्याने अपघात रोखण्यासाठी चालक एम.ए.शेख यांनी बस महामार्गाच्या खाली उतरवली मात्र बसचा वेग अधिक असल्याने चिखलामुळे बस उलटली. अपघातानंतर वाहन धारकांसह पादचार्यांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना उपचारार्थ रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातास कारणीभूत ठरलेला भरधाव ट्रक मात्र पसार झाला आहे.
रावेरच्या नगर सेवकांनी केली तत्काळ मदत
अपघाताची माहिती रावेरमध्ये कळताच नगरसेवक अॅड.सुरज चौधरी, सुधीर पाटील, राजेंद्र महाजन, सादीक शेख यांनी सहकार्यांसह धाव घेत जखमींना उपचारार्थ हलवले.