अपघात नसून खून झाल्याचा संशय

0

सोयगाव । तालुक्यातील सावळदबारा येथील तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याची घटना 6 जुलै रोजी घडली. मात्र हा अपघात नसुन घातपात असल्याचा संशय मयत तरुणाच्या आई इंदुबाई रामराव शेळके यांनी व्यक्त करुन या बाबतीत लेखी जवाब फर्दापूर पोलीस ठाण्यात दिल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. दिपक रामराव शेळके ( वय 30) असे या तरुणाचे नाव आहे. मोटारसायकलने देव्हारी-सावळदबारा रस्ताने जात असतांना अपघात होऊन गंभीर जखमी असतांना उपचारा दरम्यान मृत्यु झाले. अपघातानंतर बुलढाणा येथील जिल्हा रुग्यालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले होते. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असला तरी त्या तरुणाचा मृत्यू अपघातानेच झाल्याचे फर्दापूर पोलिसांनी सांगितले असुन या प्रकरणात घातपाताची शक्यता फेटाळुन लावली आहे. मात्र अजुन ही या तरुणाच्या मृत्यूचे गुढ कायम असल्याचे दिसत असुन अपघात की घातपात या बाबत सावळदबारा परीसरात चर्चेला पेव फुटल्याचे दिसत आहे.

पोलीस म्हणतात अपघात
घटनेची सर्व तपासणी करुन पोलीसांनी मिळालेल्या पुराव्याच्या आधारे हा घातपात नसुन अपघातच असल्याचे म्हटले आहे. फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद जर्‍हाड यांच्या सोबत संपर्क साधला असता फर्दापूर पोलिसांनी इंदुबाई शेळके यांच्या तक्रारी नुसार या घटनेचा सर्व बाजुनी तपास करुन सर्व शंका पडताळून बघितल्या असता हा घातपात नसुन अपघातच असल्याचे निष्पन्न होत असल्याचे म्हटले आहे.

चर्चेला उधाण
ग्रामीण भाग असल्याने दिपकच्या मृत्युच्या घटनेबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावळदबारा येथे महाविद्यालय असल्याने अनेक भागातुन येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला आहे त्या रस्त्याने नेहमी वाहतुक होत असल्याने नागरिकांसह तरुणांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

काही तरुणांसोबत वाद
अपघात झाल्याच्या अगोदर आठवड्याभरापूर्वी मयत दिपक शेळके याचा देव्हारी येथील तरुणांसोबत वाद झाला होता. वादात काही तरुणांनी मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. मयताच्या आईने संबंधीत प्रकार पोलीसांसमोर मांडला. तसेच हा अपघात नसुन घातपात असल्याचे पोलीसांना सांगितले. घटनेची तपासणी करुन न्याय देण्याची मागणी तरुणाच्या परिवाराने केली आहे.